Pimpri News | गणेशोत्सवात बेकायदा जाहिरातबाजीचा उन्माद

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख चौक, महामार्ग आणि बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा जाहिरातफलक लावण्यात आले आहेत. नामांकित बिल्डर, व्यापारी गट, नामवंत ब्रॅण्ड्स आणि विविध कंपन्यांनी गणेशोत्सव मंडळांच्या नावाखाली फलक लावून आपल्या उत्पादनांची मोफत प्रसिद्धी सुरू केली आहे. यामुळे शहर विद्रुपीकरण वाढत असून, महापालिकेच्या महसूलात कोट्यवधी रुपयांचा बुडीत होत आहे.
अनेक कंपन्यांनी गणेशोत्सव मंडळांच्या स्टॉल्स आणि पंडालांच्या बाहेर फलक, बॅनर आणि होर्डिंग्ज लावून उत्पादनांची मोफत प्रसिद्धी केली आहे. स्थानिक मंडळांच्या माध्यमातून फलकांना संरक्षण देत असल्याने, महापालिका जाहिरात महसूल वसूल करण्यात अपयशी ठरते आहे. या सर्व प्रकारामुळे शहराचा सौंदर्यशास्त्र बिघडले असून, नागरिकांच्या नाराजीचा भडका उडाला आहे.
महापालिकेच्या नियमानुसार, शहरात कोणत्याही ठिकाणी जाहिरातफलक लावण्यासाठी महापालिकेची परवानगी आणि शुल्क भरणे अनिवार्य आहे. मात्र, सणांच्या आडून अनेक कंपन्या आणि बिल्डर्स शुल्क न भरता मोठ्या प्रमाणावर जाहिराती करत आहेत. बेकायदा होर्डिंग्जमुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून, अपघातांचा धोकाही वाढला आहे.
स्थानिक नागरिक संघटनांकडून महापालिकेचे अतिक्रमण विभाग आणि जाहिरात नियंत्रण विभाग यांच्यावर कारवाईसाठी दबाव वाढला आहे.महापालिकेने बेकायदा जाहिरातफलकांवर दंडात्मक कारवाई करावी. नियम मोडणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे नोंदवावे. गणेशोत्सवाच्या नावाखाली होणाऱ्या बेकायदा जाहिरातबाजीला आळा घालावा, अशी मागणी दक्ष नागरिकांकडून होत आहे. नियमांनुसार, संबंधित विभागप्रमुख आणि अतिक्रमण पथकाने तत्काळ कारवाई करणे आवश्यक असतानाही, राजकीय दबावामुळे अनेक अधिकारी कारवाई टाळत आहेत.
प्रभाग रचना जाहिर झाल्यावर आगामी काही महिन्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी फलकांची अक्षरशः जत्राच भरविली आहे. प्रभागातील प्रत्येक गल्लीच्या नाक्यावर घरगुती गणेश, गौरी स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच प्रत्येक सहभागी नागरिकांवर बक्षिसांची लयलूट केली आहे. मात्र हे फलक लावण्यासाठी कोणतही परवानगी घेतलेली नाही.





