Pimpri News : तळेगावच्या गुन्हेगारी राजकारणावर लक्ष ; लोकप्रतिनिधींवरील हल्ल्याप्रकरणी एसआयटी गठीत

प्रभात वृत्तसेवा
तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे परिसरात लोकप्रतिनिधींवर गुन्हेगारांकडून होणाऱ्या हल्ल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आले आहे. हे पथक पिंपरी-चिंचवड झोन २ चे पोलीस उपआयुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत राहणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त विनयकुमार चोभे यांनी दिली आहे.या प्रकरणाचा उल्लेख महाराष्ट्र विधानमंडळाच्या २०२५ च्या पावसाळी अधिवेशनात केला गेला होता.
आमदार सुनील शेळके यांनी ०४/०७/२०२५ रोजी नियम १०५ अन्वये लक्षवेधी क्रमांक १८०५ अंतर्गत तळेगाव दाभाडे येथे लोकप्रतिनिधींवर गुन्हेगारांकडून होणाऱ्या हल्ल्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी SIT गठीत करून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते.विशेष तपास पथकात पिंपरी-चिंचवड सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे कन्हैय्या थोरात, गुंडा विरोधी पथक सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने,
बावधन पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, तळेगाव दाभाडे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र खामगळ, सहायक पोलीस अंमलदार अंकुश लांडे, सचिन बेंबाळे, सुनिल सगर या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर विशेष तपास पथकाने चौकशीची कार्यवाही त्वरीत पूर्ण करुन अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त विनायकुमार चोभे यांनी दिले आहेत.




