Pimpri News | देवाभाऊंच्या पोस्टरने शहराचे विद्रुपीकरण ; छत्रपतींची विटंबना होत असल्याचाही आरोप

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – शहराचे विद्रुपीकरण होता कामा नये. त्यामुळे शहरात कोणी अनधिकृत बॅनर, फ्लेक्स लावले तर त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मात्र, त्यांच्याच आदेशाला केराची टोपली दाखवत कार्यकर्त्यांनी शहरामध्ये ‘देवाभाऊ’ या आशयाचे अनधिकृत पोस्टर लावले आहेत. हे पोस्टर ग्रेड सेपरेटरमध्ये लावले असल्याने पोस्टरवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना होत असल्याचा आरोप सामाजिक संस्थांनी केला आहे. तर हे पोस्टर लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही महापालिका प्रशासन करणार आहे.
शहर परिसरात विनापरवाना फ्लेक्सचे पेव फुटले आहे. शहरातील प्रमुख चौक, रस्ते सार्वजनिक वापराच्या इमारती आणि भिंती यावर विना परवाना फ्लेक्स आणि जाहिराती लावल्या जात आहेत. सध्या शहरातील भुयारी मार्ग, उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटरच्या भिंतींवर विनापरवाना जाहिराती दिसून येत आहेत. विनापरवाना जाहिरातींवर कारवाईसाठी प्रभागस्तरीय पथक नेमले आहे. तर शहरभर होत असलेल्या अनधिकृत फ्लेक्सबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरामध्ये फ्लेक्स न लावण्याचे आवाहन केले होते.
तसेच अशा बॅनरवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, त्यांच्याच कार्यकर्त्यांनी शहरभर पोस्टर लावले आहेत. त्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाची कोणतीही परवानगी घेतली नाही. तसेच लावलेले पोस्टर हे विशिष्ठ केमिकलयुक्त पदार्थांचे लावले असल्याने ते निघत नाहीत. परिणामी हे पोस्टर काढणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.हे पोस्टर ग्रेड सेपरेटरच्या भिंतीवर लावलेले आहेत. त्यामुळे त्याठिकाणी पोस्टरवर चिखल उडून महाराजांची विटंबना होत असून असे पोस्टर लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
याबाबत सतीश काळे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरात भुयारी मार्ग शेजारील भिंतीवर तसेच अस्वच्छ ठिकाणी काही अज्ञात व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची राजमुद्रा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले पोस्टर लावलेले आहेत. काही ठिकाणी समाजकंटकांकडून हे घाण आढळून आले आहे. ही गंभीर बाब असून अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना झाली आहे. त्यासाठी कारवाई करण्याकरिता आयुक्तांना निवेदन दिले आहे.
“पिंपरी-चिंचवड शहरात पोस्टर्स हे अनधिकृतपणे लावले आहेत. याबाबत महापालिकेकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. पोस्टर्स लावणाऱ्यांविरूद्ध महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. या पोस्टरवर सफेद रंग लावण्यात येणार आहे. जेणेकरून महाराजांची विटंबना होणार नाही.”
-राजेश आगळे, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, महापालिका





