pimpri news : मतदार यादीवरील हरकतींसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

तळेगाव दाभाडे – राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवरील हरकती आणि सूचनांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
नागरिकांना आता शुक्रवार (दि. १७) पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक आणि उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी दिली.
नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार यादी बुधवारी (दि. ८) प्रसिद्ध करण्यात आली होती. यापूर्वी हरकती सादर करण्याची अंतिम तारीख १३ ऑक्टोबर होती, परंतु आता ती १७ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
तसेच प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २८ ऑक्टोबरऐवजी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही सुधारित माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनास प्राप्त झाल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.





