Pimpri News | भाजप कार्यकारिणीवरून गोंधळ ; नेत्यांचे राजीनामे, कार्यकर्त्यांचा संताप

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. मात्र, ही कार्यकारिणी जाहीर होताच अनेक सदस्यांनी राजीनाम्याचे शस्त्र बाहेर काढले आहे. तर काहींनी थेट आत्मदहन करण्याचाच इशारा दिला आहे.
कार्यकारिणीची निवड करत असताना त्यामध्ये ठराविक कार्यकर्त्यांना चांगले पद देण्यात आले आहे. फक्त एका आमदाराच्या सांगण्यावरून कार्यकारिणी ठरवली आहे. जुन्या जाणत्यांवर अन्याय केला असून अनेक मोठ्या पदांवर असलेल्या पदाधिकार्यांचे खच्चीकरण केला असल्याचा आरोप केला जात आहे.
भारतीय जनता पार्टी (भाजपा) पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा बुधवारी (दि. २८) मध्यरात्री करण्यात आली. गणेशोत्सवाचा शुभमुहूर्त साधून पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी ४ सरचिटणीस, ८ उपाध्यक्ष , ८ सचिव यासह प्रकोष्ठ अध्यक्ष आणि सदस्य अशी १२६ पदाधिकाऱ्यांची ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर केली.
सरचिटणीसपदी ॲड. मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाडये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ उपाध्यक्षपदी काळूराम बारणे, उपाध्यक्षपदी ॲड. विनायक गायकवाड, तुषार हिंगे, राम वाकडकर, अमित पसरणीकर, रमेश वाहिले, अजित भालेराव, विनोद मालू यांची निवड झाली.
तसेच इतरही पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती होऊऩ २४ तास होत नाही तेच राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहे.सुरूवातीला उपाध्यक्षपदी निवड झालेल्या तुषार हिंगे यांनी पदाचा राजीनामा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याकडे दिला आहे. तर सचिन काळभोर यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
त्यांना नव्या कार्यकारिणीत स्थान न मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक आणि स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर नाराजीचा सूर उमटू लागला असून, पक्षांतर्गत काही ताणतणावही स्पष्ट होऊ लागले आहेत. सचिन काळभोर हे पूर्वी भाजप पिंपरी चिटणीस पदावर कार्यरत होते. हिंगे आणि काळभोर हे दोघेही चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांचे समर्थक मानले जातात.
याउलट, काळभोर यांनी मागील विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका घेतल्याचे समजते. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, त्यांना नव्या कार्यकारिणीत डावलल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे पक्षांतर्गत गटबाजीचे संकेत मिळत असून, कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढण्याची चिन्हे आहेत.
पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा..
संतोष तापकीर गेली ३० वर्षांपासून भाजप कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. मात्र, त्यांना पद न दिल्याने त्यांनी थेट भाजपा कार्यालयात येत्या दोन दिवसांत आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत बोलताना तापकीर म्हणाले, सन २०२४ पासून पक्षाची राज्यापासून केंद्रामध्ये सत्ता आहे.
मात्र, आम्हा एकनिष्ठ कार्यकर्त्यांना पदापासून वंचित ठेवले आहे. तसेच संघटनेमध्ये खच्चीकरण करत असल्यामुळे नेतृत्वावर आणि संघटनेवरील विश्वास उडाला आहे. योग्य विचार करणार नसाल तर येत्या दोन दिवसांत निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा तापकीर यांनी दिला आहे.
“तीनशे जणांमधून कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांना या कार्यकारिणीमध्ये संधी मिळाली नाही त्यांना दुसरी पदे देऊन त्यांची नाराजी दूर करू कोणा एका आमदाराच्या कार्यकर्त्यांची नाही तर संपूर्ण शहराची कार्यकारिणी आहे. त्यामुळे कोणीही नाराज नाही.”
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा.





