Pimpri News | भाजप-राष्ट्रवादीत महापालिकेसाठी संघर्ष ; पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्याची लढाई शिगेला..

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – जसजशी महापालिकेची निवडणूक जवळ येत आहे, तसे महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील शीतयुद्ध वाढत आहे. आयुक्त शेखर सिंह हे भाजपच्या जवळेच असून त्यांच्या लोकप्रतिनिधींचीच कामे ते करतात. मात्र, राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना डावलतात असा आरोप सातत्याने केला जात आहे. तर खुद्द उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्त सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून त्यांची बदली होईलच अशी भविष्यवाणी केली होती. मात्र, तरीही आयुक्त सिंह यांची बदली न झाल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शहरातील भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांवर अप्रत्यक्षपणे आरोपांच्या फैरी झाडत आहेत.
महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना १६ ऑगस्टला महापालिकेमध्ये तीन वर्ष पूर्ण होत आहेत. रुजू झाल्यापासून सर्वाधिक काळ त्यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले आहे. राज्यात महायुतीची सत्ता असताना आयुक्त शेखर सिंह हे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या इशार्यावरच काम करत असल्याचा आरोप होत आहे. तर भाजपच्या इतर तीन आमदारांच्याही बोलण्याला काहीअंशी किंमत दिली जाते. मात्र, अजित पवार यांनी ज्या महापालिकेमध्ये आपले वर्चस्व गाजवले त्याचठिकाणी त्यांच्या पक्षातील पदाधिकार्यांना कामांसाठी झुंजावे लागत आहे. प्रभागातील कामे असो की विकास प्रकल्पात मत मांडायचे असो, राष्ट्रवादी काँग्रसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अक्षरशः थारा दिला जात नाही.
शहराचा विकास आराखडा केला त्यातही राष्ट्रवादीच्या कोणत्याही पदाधिकार्याला विचारात घेतले नाही. मात्र, काही ठराविक लोकांना घेऊनच हा आराखडा केला असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. त्याचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीने गेल्या आठवड्यात विकास आराखड्याविरोधात जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चाने विकास आराखड्यावरील प्रश्न तर सुटला नाही, पण राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष यांच्या पदरी अपमान पडला. मोठ्या व संविधानिक पदावरील व्यक्ती आंदोलनात सहभागी होऊऩ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दाराशी आला असतानाही प्रशासनातील अधिकार्यांने साध त्यांच स्वागतही केल नाही.
हाच घाव राष्ट्रवादीच्या आणखीच वर्मी लागला आहे.दुसरीकडे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी भोसरीतील एका कार्यक्रमात आयुक्त यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांची बदली होईल. नवीन येणार्या आयुक्तांकडे आपण आपल्या समस्या मांडू असे सांगितले होते. खुद्ध पालकमंत्री पवार बोलले म्हणजे आयुक्त सिंह यांची बदली होणारच…ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ असल्याच्या बढाया राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी मांडल्या. मात्र, त्याचही गणित उलटच झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आयुक्तांची बदली थांबवली असून ते त्यांच्या मर्जीतील अधिकारी असल्याची टीका राष्ट्रवादीने सुरू केली आहे.
महापालिकेची निवडणूक येत्या तीन ते चार महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी मर्जीतील आयुक्त असले की निवडणूक सोपी जाणार हे अलिखित सत्य आहे. त्यासाठी एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस आयुक्त सिंह यांना ठेवण्यासाठी उत्सुक आहेत. तर उपमुख्यमंत्री पवार नवीन आयुक्तांच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, यावरून महायुतीतीलच या दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी धडपड..
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील पक्ष पिंपरी चिंचवडमध्ये स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. भाजपने स्वबळावर तयारी सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड म्हणजे अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जात असत. याच बालेकिल्ल्याला सन २०१७ मध्ये भाजपने सुरुंग लावत आपली सत्ता स्थापन केली. आता राज्यात जरी हे दोन्ही पक्ष मांडीला मांडी लावून बसलेले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र मिळवण्यासाठी पक्षांनी धडपड सुरू केली आहे.
दादा की भाऊ?
पिंपरी चिंचवड महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये युद्ध सुरू झाले आहे. महापालिकेवर अजितदादा की देवाभाऊ वर्चस्व गाजवणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.





