Pimpri News | डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी जागरूकता शिबिर ; एसबीआयचा प्रेरणादायी उपक्रम

प्रभात वृत्तसेवा
खालापूर – स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) क्षेत्रीय व्यावसाय कार्यालय पनवेल यांच्या वतीने खोपोली येथील समर्थ मंगल कार्यालयात आर्थिक साक्षरता जागरूकता शिबिर गुरुवारी (दि. १४) उत्साहात पार पडले.या वेळी एसबीआयचे चेअरमन सी.एस. शेट्टी यांच्या हस्ते मुद्रा कर्ज वाटप, सीएसआर फंडातून शांतीनगर मराठी शाळेला पाच लाख रुपयांची मदत केली. तसेच चिलठण हायस्कूलमधील विद्यार्थिनींना ५० सायकलींचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी चीफ जनरल मॅनेजर मुंबई मेट्रो मंजू शर्मा, डीएमडी अरविंद सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डीजीएम पूर्व मुंबई नवीन मिश्रा, प्रादेशिक व्यवस्थापक सूर्यजीत सिंग, मुख्य व्यवस्थापक मुकेश कुमार, खालापूर पंचायत समितीचे सदस्य, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य तसेच महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
याप्रसंगी आदर्श महिला बचत गट, दत्तकृपा विघ्नहर्ता महिला बचत गट, शिवसमर्थ, पंचशील गावदेवी या संस्था तसेच मावळ तालुक्यातील आदर्श सरपंच लक्ष्मण ढाकू पारखे व कान्हे ग्रामपंचायत सरपंच गणेश तुकाराम भानुसारे यांचा सत्कार करण्यात आला. शिबिरात प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत नवीन खाते उघडणे, सुरक्षा व जीवन विमा योजना, निष्क्रिय खाती सक्रिय करणे, बचत खात्यात नामनिर्देशन अद्ययावत करणे, डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती, अदाव्या ठेवींवरील तक्रार निवारण प्रणाली आदी विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली.





