Pimpri News | आंध्रप्रदेशच्या शिष्टमंडळाची पालिकेला भेट

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – आंध्र प्रदेश राज्यातील विविध महापालिका व संस्थांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी विशेष दौऱ्यावर आले होते. त्यांनी शहरातील विविध प्रकल्पांची पाहणी करताना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरणपूरक धोरणांबद्दल समाधान व्यक्त केले.
शिष्टमंडळात तडीपात्री महापालिकेचे आयुक्त एस. शिव रामकृष्णा, विशाखापट्टणम महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ई. एन. व्ही. नरेशकुमार, कार्यकारी अभियंता के. गुरप्पा यादव, कार्यकारी अभियंता एम. नारायण स्वामी, तांत्रिक तज्ज्ञ श्रीनिवास रेड्डी, वरिष्ठ प्रकल्प सहकारी (सीडीएमए) एम. डी. जावेद आणि प्रकल्प सहकारी (स्वच्छ आंध्र कॉर्पोरेशन) एस. डी. रहतुल्लाह यांचा समावेश होता.
या सर्वांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सल यांनी विविध प्रकल्पांची माहिती दिली.
आंध्र प्रदेश राज्यातील शिष्टमंडळाने शहरातील आरोग्य विभाग व पर्यावरण विभाग यांच्या अधिपत्याखाली चालू असलेले दारोदारी कचरा संकलन व वर्गीकरण प्रक्रिया, दापोडी येथील शून्य कचरा प्रकल्प, कचरा ट्रान्सफर स्टेशन, मोशी येथील बांधकाम राडारोडा प्रक्रिया प्रकल्प, बायो मिथिलेशन प्रकल्प आदी उपक्रमांचा आढावा घेत प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.
शहरातील निवासी संकुले, औद्योगिक क्षेत्रे, व्यावसायिक आस्थापना, रुग्णालये, भाजीबाजार यांसारख्या विविध स्त्रोतांमधून निर्माण होणारा घरगुती कचरा, प्लास्टिक, पालापाचोळा, उरलेले अन्न, जैविक व अजैविक कचरा, ई-कचरा तसेच जैववैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम महापालिकेकडून केले जाते, या संपूर्ण प्रक्रियेची माहिती शिष्टमंडळाने जाणून घेतली.
“पिंपरी चिंचवड महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात शाश्वत व नाविन्यपूर्ण उपाययोजना राबविल्या आहेत. शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. नागरिकांचा सहभाग, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व काटेकोर नियोजन यांच्या जोरावर आज महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनात एक आदर्श उभा केला आहे.”
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका




