हिंजवडी : मुळशी मावळ, खेड, हवेली, शिरूर अशा पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या कासरसाईतील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार विदुरा तथा नानासाहेब नवले यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष खेड तालुक्यातील मरकळ गटातून निवडून आलेले संचालक अनिल लोंखडे यांची बिनविरोध वर्णी लागली. कारखान्याच्या 2025 ते 2030 या पंचवार्षिक कार्यकाळासाठी संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर सर्वपक्षीय नेते मंडळीकडून ठरल्याप्रमाणे कारखान्याच्या अध्यक्षपदी नवले यांच्या नावाची यापूर्वीच घोषणा करण्यात आली होती. परंतु उपाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर बुधवारी (दि. १६) निवडणूक निर्णय अधिकारी मुकूंद पवार यांच्या अध्यक्षेतेखाली कारखाना सभागृहात दोन्ही पदांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी नवले व लोंखडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. निवडीनंतर चेतन भुजबळ यांनी प्रास्ताविक करत नवनिर्वाचित मान्यवरांचा स्वागत सत्कार केला. यावेळी मावळते उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे,माऊली दाभाडे,चेतन भुजबळ, दत्तात्रय जाधव, धैर्यशील ढमाले, यशवंत गायकवाड, दत्तात्रय उभे, संदीप काशिद, छबुराव कडू, भरत लिम्हण, उमेश बोडके, विलास कातोरे, अतुल काळजे, धोंडीबा भोंडवे, लक्ष्मण भालेराव, राजेंद्र कुदळे, शिवाजी कोळेकर, संचालिका ज्योती अरगडे, शोभा वाघोले, कार्यकारी संचालक साहेबराव पठारे आदी उपस्थित होते. या प्रक्रियेसाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे प्रतिनिधी म्हणून सुरेश घुले यांनी समन्वयक म्हणून भूमिका पार पाडली. ’या’ कारणासाठी उपाध्यक्ष पदचा मिळाला मान लोखंडे यांना यापूर्वीचा उपाध्यक्षपदाचा अनुभव असल्याने तसेच अनेक टर्म त्यांनी कारखाना हितासाठी महत्वाचे निर्णय घेतल्याने किंबहुना खेड तालुक्यातून अधिकाधिक ऊस पुरवठा होत असल्याने लोखंडे यांच्या नावावर सर्व संचालकांचे एकमत झाले. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार निवडीनंतर अध्यक्ष नानासाहेब नवले व उपाध्यक्ष अनिल लोंखडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यातील सर्वपक्षीय प्रमुख नेते, आमदार, खासदार तसेच सर्व संचालक मंडळ, शेतकरी सभासदांचे आभार मानले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने कारखाना हे एक कुटूंब असून त्याप्रमाणे सर्वांना विश्वासात व बरोबर घेऊन कारखान्याच्या किंबहुना शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे नवले यांनी सांगितले.