Pimpri : महापालिका घेणार दीडशे रुपयांचा एक उंदीर

पिंपरी : निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयाचे गेल्या आठ वर्षांपासून संथ गतीने काम सुरू आहे. त्यात या प्राणीसंग्रहालयातील सर्पांसाठी पांढरे उंदीर खरेदी करण्यात येत आहेत. त्यासाठी तब्बल ९ लाख रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
गेल्या आठ वर्षांपासून प्राणीसंग्रहालय नागरिकांसाठी बंद आहे. प्राणीसंग्रहालय नूतनीकरण आणि सुभोभीकरणाचे काम २०२१७ पासून सुरू आहे. तब्बल २० कोटी रूपयांचा खर्च करूनही कासव गतीने काम सुरू असल्याने काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे त्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आला होता. आता नव्याने २४ कोटींचा खर्च करण्यात येत आहे. त्या खर्चास गेल्या स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली आहे.
त्यासाठी प्राणिसंग्रहालय आणखी दीड वर्षे बंद राहणार आहे. असे असताना तेथील सर्पांसाठी महापालिकेने पशू वैद्यकीय विभागाने पांढरे उंदीर खरेदी केले आहेत. त्यासाठी पशू वैद्यकीय विभागाने निविदा काढली होती. त्यात ३ पुरवठादारांनी निविदा भरली. सॅम एन्टरप्रायजेस या पुरवठादाराने एका पांढर्या उंदराचा १६८ रूपयेऐवजी १५९ रूपये दराने भरलेली लघुत्तम निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. या पांढरा उंदराचा आवश्यकतेनुसार दोन वर्षे पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण ८ लाख ६१ हजार ८४० रूपये खर्च केला जाणार आहे.
पांढरे उंदीर हे खाण्यायोग्य व निश्चित केलेल्या वजनाचे असावेत. त्याचा नियमितपणे पुरवठा करावा, असे बंधन पुरवठादारावर असणार आहे. पांढरे उंदीर खरेदीच्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
प्राणिसंग्रहालय सध्या बंद आहे. स्थापत्य विभागाच्या वतीने त्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये विविध जातीचे ५२ सर्प आहेत. त्यांची देखभाल करण्यासाठी तिथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्पांना आठवड्यातून एक किंवा दोन पांढरे उंदीर खाद्य म्हणून दिले जातात. दरवर्षी त्यांची खरेदी केली जाते.
– संदीप खोत, उपायुक्त, पशू वैद्यकीय विभाग





