Pimpri : महापालिका लावणार दीड लाख देशी वृक्ष

पिंपरी : शहराचा पर्यावरणाचा समतोल राखला जावा तसेच निरोगी वातावरण मिळण्यासाठी महापालिकेच्या वतीने वृक्षलागवड करण्यात येणार आहे. उद्यान व वृक्ष संवर्धन विभागामार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या वर्षभरात सुमारे दीड लाख देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्याची सुरुवात जागतिक पर्यावरण दिनापासून करण्यात येणार आहे. तसेच ५ ते ११ जून २०२५ या कालावधीत वृक्षारोपण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने आयोजित या वृक्षारोपण सप्ताहात पिंपरी चिंचवडमधील सर्व नागरिक, ज्येष्ठ नागरिक संघटना, सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी व शालेय विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये देशी वृक्षांची लागवड व जनजागृती, ज्येष्ठ नागरिक, वृक्षतज्ञ व सामाजिक संस्थांचे संवाद सत्र, संरक्षण खात्याच्या जागांवर वृक्षारोपण आदी उपक्रमांचा समावेश आहे.
वृक्ष हे फक्त सौंदर्यासाठी नसून ते प्राणवायूचे स्रोत, छाया व जैवविविधतेचे रक्षण करणारे घटक आहेत, त्यामुळे पर्यावरण पूरक जीवनशैलीसाठी नागरिकांनी दरवर्षी किमान एक तरी देशी वृक्ष लावून त्याचे पालनपोषण करावे. हा वृक्षारोपण सप्ताह म्हणजे केवळ उपक्रम नाही तर आपल्या भविष्यासाठी केलेला एक संकल्प आहे. या उपक्रमात महिलांचे, शालेय विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर योगदान अपेक्षित आहे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त.





