पिंपरी : मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा उपक्रमाच्या अंतिम मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महापालिकेने महापालिका श्रेणीत राज्यात दुसरे स्थान पटकावले आहे. गुणवत्ता परिषदेने (क्यूसीआय) घेतलेल्या मूल्यमापनात महापालिकेला १०० पैकी ८५. ७१ गुण मिळाले असून, उल्हासनगर महापालिका प्रथम क्रमांकावर आहे. पालिकेची ही कामगिरी म्हणजे राज्यातील शासकीय प्रशासनात सुधारणा व नागरिकाभिमुख शासन कार्यपद्धतीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे फलित आहे. डिजिटल प्रशासन, पायाभूत सुविधा, स्वच्छता व तत्पर सार्वजनिक सेवांच्या क्षेत्रात पालिकेने आपले नेतृत्व सिद्ध केले असल्याची भावना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखड्यात राज्यातील ४८ विभाग व विविध क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश होता. अंतिम टप्प्यात क्यूसीआय ने कार्यालयांचे संकेतस्थळ सुलभता, कार्यालयीन पायाभूत सुविधा, तक्रार निवारण यंत्रणा, रहिवास सुलभता, गुंतवणूक प्रवर्धन व तंत्रज्ञान समावेश अशा १० महत्त्वाच्या निकषांवर मूल्यमापन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम निकाल जाहीर करताना सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागांचे व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. या सर्वांच्या प्रभावी व कल्पक अंमलबजावणीमुळे राज्य प्रशासन अधिक नागरिकाभिमुख, कार्यक्षम व आधुनिक बनत आहे, असेही ते म्हणाले. या सर्व उपक्रमांमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेची कामगिरी कार्यक्रमाच्या मध्यकालीन आढाव्यात सर्वोत्तम ठरली होती आणि अंतिम मूल्यांकनातही ती सिद्ध झाली. मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा उपक्रमात मिळालेलं यश आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. राज्यातील सर्वोत्तम महापालिकांमध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश झाला याचा आनंद वाटतो. हे यश मिळाल्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांचे आणि राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार मानतो. हे यश म्हणजे चांगल्या प्रशासनासाठी सर्वानी केलेल्या सामूहिक प्रयत्नांची पावती आहे. आगामी काळात पालिकेच्या सेवा अधिक प्रभावी, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका