Pimpri : महापालिका झाली पेपरलेस

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत जानेवारी २०२५ पासून डिजिटल कारभार अर्थात ई-ऑफिस सुरु करण्याची चर्चा सुरु होती. अखेर महापालिकतील कारभार पेपरलेस झाला असून ई-ऑफिसला प्रत्यक्षात नवीन आर्थिक वर्षांपासून मंगळवारी (दि.१) सुरुवात झाली. आर्थिक, प्रशासकीय आणि कामांबाबतचा कारभार डिजिटल सुरू झाला असून फायली हाताळणे बंद केल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
महापालिकेत प्रत्येक विभागात मोठ्या प्रमाणावर फाइल्सचा ढीग आहे. शासनाच्या १०० दिवसांच्या उपक्रमामध्ये या फाइल्स तपासून त्यावर कार्यवाही करण्याची ही प्रक्रिया सुरू आहे. यापुढे कागदपत्रे डिजिटल स्वरूपात जतन करण्यात येणार आहेत. पेपरलेस कारभार सुरू व्हावा, तसेच नवीन तंत्रज्ञानानुसार डिजिटल प्रणालीचा वापर करण्यासाठी ई-ऑफिस ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे. त्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या आहेत, तसेच विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकारी, प्रशासन अधिकारी, शाखा प्रमुख, लिपिक यांना प्रशासकीय कामकाजासाठी डिजिटल कोड देण्यात आली आहे.
मार्चअखेर महापालिकेच्या सर्व विभागातील हस्तलिखित कामकाज बंद करण्यात आले. १ एप्रिल २०२५ पासून ई-ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. तसेच, ही पध्दत अवलंबविणारी ही राज्यातील पहिलीच महापालिका असल्याचेही आयुक्त सिंह यांनी म्हटले आहे.
महापालिकेच्या सर्व विभागात १ एप्रिलपासून ई-ऑफिस प्रणालीने कामकाज सुरू करण्यासाटी सर्व तयारी केलेली होती. त्यानुसार सर्व विभागांचे कामकाज सुरु झालेले आहेत. सर्व विभागात या पद्धतीने कामकाज सुरू होईल. पिंपरी-चिंचवड महापालिकेने नवीन तंत्रज्ञानाकडे टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यापुढे माझ्या कार्यालयात देखील कोणतीही फाईल येणार नाही. तर सर्व काम ऑनलाइन चालेल.
– शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका





