Pimpri : पालिका आयुक्तांचा अधिकारी, कर्मचार्यांवरील वचक संपला

पिंपरी : गेली तीन वर्षांपेक्षा अधिक काळ महापालिकेत प्रशासकीय राजवट असताना अधिकारी व कर्मचार्यांचा कामकाजादरम्यान बेशिस्तपणा वाढल्याची बाब निदर्शनास आली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर या कर्मचार्यांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला आहे.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात लिपिक तथा ग्रंथपाल या पदावर कार्यरत असलेल्या सुमेधा नाफडे यांच्या कार्यकाळात 10 लाख, 21 हजार 205 रुपये किमतीची पुस्तके गहाळ झाल्याची बाब उघडकीस आली आहे. दरम्यानच्या काळात नाफडे या सेवानिवृत्त झाल्या असल्यातरी त्यांच्या पेन्शनमधून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत.
नाफडे या वायसीएम रुग्णालयात एकूण 14 वर्षे कार्यरत होत्या. या कालावधीत त्यांच्याकडून अन्य कर्मचार्यांना चार्ज देणे, घेणे या कार्यालयीन कामकाजात अनियमितता आढळून आली. त्यांच्या सेवाकाळात आलेल्या पुस्तकांची वेळोवेळी नोंद घेणे अपेक्षित असताना त्यांनी हे कामकाज केले नसल्याची बाब निदर्शनास आली. पुस्तक गहाळ प्रकरणी आक्षेप उपस्थित झाल्याने त्रिसदस्यीय समितीने केलेल्या फेरचौकशीत नाफडे या दोषी आढळल्या. त्यानुसार त्यांच्या पेन्शनमधून 10 लाख, 21 हजार 205 रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागातून सुरक्षा रविभागात बदली केलेल लिपिक राजू बाबुराव कांबळे यांनी रुजू होणार्या कर्मचार्यास चार्ज न देता परस्पर वैद्यकीय रजेवर गेले. त्यामुळे नागरी सेवा नियमांचा भंग झाल्याने त्यांची विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र चौकशी अधिकार्यांनी एकतर्फी अहवाल दिला असून, या अहवालाचे परिक्षण होऊन योग्य न्याय देण्याची विनंती केली होती. या बाबींचा विचार करून कांबळे यांची वेतनवाढ स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.
तर लिपिक पदावर कार्यरत असलेले हिरालाल शंकेर साखरे या कर्मचार्याच्या नावे पुणे महापालिकेत व्यवसाय परवाना असल्याची बाब उघडकीस आली आहे. याची चौकशी केल्यानंतर यामध्ये तथ्य आढळले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचा भंग केल्यामुळे या लिपिकाला सक्त ताकीद देत या लिपिकाची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
अधिकार्यांचे बेजबाबदार वर्तन
महापालिकेच्या वतीने 31 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत जाधववाडी, कुदळवाडी व परिसरातील अनधिकृत भंगार गोदामांवर आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. या कालावधीत क क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागातील कार्यकारी अभियंता समीर हनुमान दळवी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात तांत्रिक कर्मचार्यांसह उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या अनुपस्थितीत महावितरण कर्मचार्यांशी समन्वय न साधता आल्याने कामकाजात अडथळा निर्माण झाला. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या भ्रमणध्वनीसदेखील दळवी यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी सादर केलेला खुलासा संयुक्तिक वाटत नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आदेश दिले आहेत.





