Pimpri : रेल्वेच्या समस्यांबाबत मनसे आक्रमक

लोणावळा : लोणावळ्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी, मनसे शहर अध्यक्ष निखिल भोसले यांच्या नेतृत्वात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात लोणावळा ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या विविध समस्या आणि मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.
लोणावळा ते पुणे मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. यामध्ये शाळा-कॉलेज तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. मागील काही काळात रेल्वे स्टेशनवर महिलांच्या छेडछाडीच्या आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने निवेदनातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे, तसेच तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे.
यावेळी रमेश म्हाळसकर, दिनेश कालेकर, अभिजीत फासगे, विश्रांत साठे, किशोर साठे, जुबेर मुल्ला, संदीप बोभाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. रेल्वे मंत्र्यांनी आणि खासदार बारणे यांनी नागरिकांच्या समस्यांवर विचार करून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा असल्याचे शहराध्यक्ष निखिल भोसले यांनी सांगितले.
निवेदनातील प्रमुख मागण्या
भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे
लोणावळ्यात फास्ट ट्रेनचा थांबा पुन्हा सुरू करावा
पुणे – लोणावळा दरम्यानच्या रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही बसवावेत
प्रत्येक स्टेशन आणि फलाटावर दोन रेल्वे पोलिसांची नेमणूक करावी
प्रत्येक फलाटावर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये बांधावीत
रेल्वे स्टेशनवर किमान दोन तिकीट घर किंवा बुकिंग काउंटर असावेत
महिलांसाठी रेल्वे स्टेशनवर प्रतीक्षालय आणि हिरकणी कक्ष उभारावेत
पुणे ते लोणावळा दरम्यानच्या स्टेशनवर मावळमधील पर्यटन स्थळांची माहिती देणारे फलक लावावेत





