Pimpri : शहरातील पाणी-बाणीची शहराबाहेरील आमदारांना चिंता

पिंपरी : शहरामध्ये उन्हाची तीव्रता वाढली असून पाण्याची मागणी देखील वाढली आहे. शहरातील ३५ लाख लोकसंख्येसाठी ७५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत ६२० एमएलडी पाणीपुरवठा होत असून शहरातील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. परिणामी, शहरात मार्चच्या सुरुवातीलाच पाणी-बाणी सुरू झाली आहे. याबाबत शहराबाहेरील आमदारांनी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला आहे.
शहरात विधान परिषदेतील दोन आणि विधानसभेतील तीन असे एकूण पाच आमदार आहेत. त्यापैकी चार भाजपचे तर एक राष्ट्रवादी काॅंग्रेसचा आहे. परंतु शहराबाहेरील भाजपचे विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी शहरातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. शहराच्या पाणी नियाेजनासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाकडून शासनाला पाण्याच्या नियाेजनाबाबत विचारणा केली आहे का, पाण्याचे नियोजन झाले नसल्यामुळेशहरातील सर्वच गृहनिर्माण संस्थांना विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याबाबत माेठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. तक्रारींच्या अनुषंगाने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणती कार्यवाही केली, असे प्रश्न उपस्थित केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना म्हणाले की, ‘‘ महापालिकेच्या हद्दीतील गृहनिर्माण संस्थांना विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीत तथ्य आहे. सद्य:स्थितीत पवना धरणातून ५२०, आंद्रातून ८०, एमआयडीसीकडून २० असे ६२० एमएलडी पाणी उचलले जाते. या पाण्यावर प्रक्रिया करून शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहराची लाेकसंख्या ३५ लाखांच्या घरात गेली आहे. या लाेकसंख्येसाठी ७५० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भामा आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी उचलण्यासाठी जलवाहिनी टाकण्यासह इतर कामे प्रगतिपथावर आहेत. डिसेंबर २०२५ अखेर ही कामे पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. पाणी साठवणक्षमता वाढविण्यासाठी पाण्याचे अतिरिक्त जलकुंभ (टाक्या), जलवाहिनी टाकण्याची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर कमी पाणी पुरवठा होणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पुरेसा पाणीपुरवठा हाेण्यास मदत होणार आहे.
पाच वर्षांपासून एक दिवसाआड पाणी
पिंपरी चिंचवड शहराच्या उपनगरांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा करता यावा. तसेच काही महिन्यांसाठी प्रयोग म्हणून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगत तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २५ नोव्हेंबर २०१९ ला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. आता, हीच पद्धत योग्य असून सुरळीत पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहे. तब्बल पाच वर्षांपासून दिवसाआड पाणी सुरू असतानाही प्रशासन ही पद्धत बंद करण्याच्या कोणत्याही तयारीमध्ये सद्यस्थितीत नाही.





