Pimpri : रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी आमदार सुनील शेळके

तळेगाव दाभाडे : मावळचे आमदार सुनील शेळके यांची महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्या स्वाक्षरीने आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सुनील शेळके यांच्या या नियुक्तीमुळे ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मावळ विधानसभा क्षेत्रातून सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले सुनील शेळके हे सामाजिक कार्यात सक्रीय असून मागील काही वर्षांपासून त्यांनी ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली रोजगार हमी योजनेत ठोस उपाययोजना व नवीन प्रकल्प राबविले जातील, असा विश्वास व्यक्त करीत नागरिकांनी निवडीचे स्वागत केले आहे.
निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार सुनील शेळके म्हणाले, ‘ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना रोजगार मिळावा आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नव्या योजना आणण्याचा माझा मानस आहे.’
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर वरिष्ठ नेत्यांनी सुनील शेळके यांचे नियुक्तीबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
रोजगार हमी योजना समिती
समितीचे प्रमुख आमदार सुनील शेळके असून सदस्य म्हणून डॉ. संजय कुटे, डॉ. सुरेश खाडे, अमोल जावळे, विजयकुमार देशमुख, राजेश बकाने, हरिष पिंपळे, विनोद अग्रवाल, महेश चौघुले, राजेश वानखडे, विश्वनाथ भोईर, आमश्या पाडवी, शांताराम मोरे, हिकमत उढाण, काशिनाथ दाते, शंकर मांडेकर, संजय देरकर, नितीन देशमुख, शिरीषकुमार नाईक आणि बापूसाहेब पठारे यांचा समितीत समावेश आहे.





