पिंपरी: महापौर परिषदेच्या पुरस्काराने राष्ट्रवादीसह विरोधकांना चपराक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेस उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र महापौर परिषदेतर्फे “ब’वर्ग महापालिकांच्या गटात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाला आहे. त्यामुळे भाजपाच्या कार्यकाळात कामे झाली नाही, विकास झाला नाही. अनागोंदी कारभार झाला, असा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी, शिवसेनेसह विरोधकांना मोठी चपराक बसली आहे, अशी टीका भाजपाचे माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केली आहे.
याबाबत पवार यांनी प्रसिद्घीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र महापौर परिषद परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांना दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो. यासाठी प्रश्नावलीद्वारे महापालिकांकडून माहिती मागविण्यात येते. या कामाचे परीक्षण करून पुरस्कारार्थींची निवड करण्यात येते. सन 2018-19 या वर्षात महापालिकांनी केलेल्या कामांची माहिती महाराष्ट्र महापौर परिषद आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या वतीने मागविण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखील यात सहभाग घेत आपण केलेल्या कामांची माहिती पाठवली होती.
राज्यात सध्या 27 महापालिका आहेत. त्यापैकी ठाणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक या तीन महापालिकांचा समोवश ब – वर्गात आहे. ठाणे येथे शिवसेनेची आणि नाशिकमध्ये भाजपाची सत्ता होती. शिवसेनेला धोबिपछाड देत पिंपरी-चिंचवडमधील भाजपा सत्ताकाळात महापालिका प्रशासनाने दमदार कामगिरी केली आहे.
महापालिकेचे प्रशासकीय कामकाज, विविध सभांच्या कामकाजाची कार्यपद्धती, अर्थसंकल्पीय नियोजन, राबविलेल्या विविध योजना, उपक्रम, ऑनलाइन सेवासुविधा, केंद्र आणि राज्य शासनाच्या महापालिकांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी, विविध ठिकाणच्या आरक्षित भूखंडाचा विकास, पाणी पुरवठ्याचे सुयोग्य नियोजन, मल:निस्सारण योजनांची सर्व भागात केलेली कामे, घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्यापासून खत आणि वीजनिर्मिती, महिला व बालविकास योजना, ज्येष्ठ नागरिक व निराधार व्यक्तींसाठीचे उपक्रम, कौशल्य विकास योजना, दिव्यांगांसाठी राबविलेल्या योजना, स्वच्छता, आरोग्य सुविधा, वैद्यकीय सुविधा आदी विविध स्तरावर पिंपरी चिंचवड महापालिकेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
त्यामुळे ब वर्ग महापालिकांच्या गटात पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेले आरोपांचे राजकारण पिंपरी-चिंचवडकरांच्या लक्षात आले आहे. राज्य पातळीवर शहराचा आणि महापालिकेचा लौकीक होत असताना केवळ राजकीय स्वार्थासाठी आरोपांचा भडीमार करणे, न्याय्य नाही, असे म्हणावे लागेल.





