Pimpri : उन्हाळी पर्यटनासाठी माथेरान सज्ज !

माथेरान : सध्या शाळांना सुट्टी लागल्यामुळे आणि वीकेंड असल्याने माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालविण्यासाठी अनेक कुटुंब माथेरानकडे वळत आहेत. प्रचंड गरमीमुळे त्रस्त झालेले नागरिक थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानला पसंती देत आहे.
एकीकडे मुंबई सारख्या शहराचे तापमान जिथे ३५ ते ४२ अंश डिग्री सेल्सियस आहे, तिथे माथेरानमध्ये फक्त २५ ते ३० अंश डिग्री सेल्सियस तापमान पाहायला मिळते, काहीवेळा याहून कमी तापमान असते. त्यामुळे उन्हाच्या काहिलीत जीवाला थंडावा आराम मिळावा, तसेच कुटुंबासोबत चांगले क्षण जगण्यासाठी नागरिक माथेरानकडे वळत आहेत. यासह माथेरानमध्ये आल्यावर घोडेस्वारी, मिनी ट्रेन आणि इ-रिक्षाची सोय पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.
माथेरान हे वाहनमुक्त हिल स्टेशन असून येथे पारंपरिक घोडेस्वारी इ-रिक्षांचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे वयोवृद्ध नागरिक सह लहान मुलांसाठी प्रवास सुलभ झाला आहे. त्याचबरोबर निसर्गरम्य वातावरण, थंड हवामान, विविध निसर्गदृश्ये, विविध पक्ष्यांचा सकाळ संध्याकाळ होणारा किलबिलाट, पॉइंट फिरत असताना अनेक वन्यजीव समोर येतात, असे आनंदाचे अनेक क्षण अनुभवता येतात.
ट्रेकिंगच्या अनेक वाटांमुळे माथेरान पिकनिकसाठी हॉटस्पॉट ठरत आहे. सोबत पर्यटकांना आकर्षक पर्यटन घडावे यासाठी स्थानिक व्यवसायांनी दुकाने, हॉटेल्स आदींना खास रंगोरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई करून परिसर खास प्रकारे सजविला आहे. माथेरान नगरपालिका व स्थानिक प्रशासन स्वच्छता आणि सुरक्षिततेवर भर देत असल्याने येथील पर्यटन अधिक सुरक्षित व आनंददायी बनले असून यामुळेच पर्यटकांचा ओघ माथेरानकडे वाढत आहे.





