Pimpri : मांजामुळे अनेक पक्ष्यांवर संक्रांत

पिंपरी : पोलीस आणि प्रशासनाने झाकलेल्या डोळ्यांमुळे अनेक निष्पाप पक्ष्यांच्या जिवावर संक्रांत बेतली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात पक्षी जखमी झाले. ज्यात प्रामुख्याने घारींचा समावेश आहे. पतंग उडविण्याचा आनंद दरवर्षी उन्मादाच्या पातळीवर जाऊन पोहचतो. इतरांची पतंग कापण्याच्या अट्टाहासाने अनेक मुक्या पक्ष्यांचे पंख आणि गळे कापले जात आहेत. सरकारने पूर्वीच नायलाॅन आणि चायनीज मांजावर बंदी घातली आहे. परंतु पोलीस आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ही बंदी कागदावरच राहिली असून नायलाॅन मांजाच्या सोबतीने पतंग आकाशात उंच भराऱ्या घेत आहेत.
संक्रांतीला पतंग उडविण्याचे फॅड गेल्या काही वर्षांपासून शहरात वाढतच चालले आहे. मूळत गुजरातमधील ही परंपरा महाराष्ट्रातही आली आणि येथील पक्ष्यांसाठी देखील काळ बनली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीपासूनच शहरात पतंग दिसू लागले. गेल्या आठवड्यापासून याचे प्रमाण वाढले. रविवारपासून मोठ्या संख्येने आकाशात पतंग दिसत आहे. पतंग केवळ उडविण्याचा खेळ नसून धारदार मांजाने दुसऱ्याच्या पंतगासोबत पेच लढवून कापण्याचा खेळ बनला आहे. जास्तीत-जास्त पतंग कापण्यासाठी जास्तीत-जास्त धारदार मांजा वापरण्याकडे मुलांचा आणि तरुणांचा कल असतो. परंतु आपल्या या क्षुल्लक आनंदापायी आपण मुक्या पक्ष्यांचे जीव घेत आहोत, हे भान त्यांना उरत नाही.
गेल्या दोन दिवसांमध्ये जवळपास आठ जखमी पक्ष्यांना मांजाच्या गुंत्यातून सोडवले. मोठ्या प्रमाणावर पक्षी जखमी होत आहेत. यात घारींचे प्रमाण अधिक आहे. जखमी पक्ष्यांवर उपचार करुन त्यांना सोडले. दरवर्षी पक्षी जखमी होत आहेत. ज्या पक्ष्यांबाबत माहिती मिळते तिथे पशू-पक्षीप्रेमी धाव घेतात. परंतु ज्या पक्ष्यांबाबत माहिती मिळत नाही, ते जखमी होऊन आणि मांजामध्ये अडकून प्राण त्यागतात. हे थांबायला हवे.
– विनायक बडदे, सचिव, वन्य जीव सामाजिक संस्था
मुलांना माहिती पण पोलिसांना नाही
शहरात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून नायलाॅन मांजा विकला जात आहे. लहान मुलांना आणि तरुणांना चांगला मांजा कुठे मिळतो, हे माहीत आहे, परंतु पोलिसांना मात्र कळत नाही. गेल्या चार दिवसांपासून पक्षी जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वर्षांपूर्वी शहरात मांजामुळे एका डाॅक्टर तरुणीने आपले प्राण गमावले आहेत. काही नागरिक देखील जखमी झाले आहेत. तरी देखील पोलीस आणि प्रशासन जागे होत नाही. सुमारे पंधरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मांजाची विक्री होत असताना पोलिसांनी वेळेवर कोणतीच मोठी कारवाई न केल्याने पक्ष्यांना यातना सहन कराव्या लागत आहेत.
सायंकाळचे थवे दिसेनात
दररोज सायंकाळी शहराच्या काही भागात मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे थवे दिसून येतात. परंतु सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी पक्ष्यांचा मुक्त संचार थांबला होता. आकाशात खूप कमी पक्षी दिसून येत होते. जे पक्षी होते ते देखील खूप उंचावर उडत होते. बहुदा पक्ष्यांनाही पतंग आपला काळ बनून आल्याचे कळाले असावे आणि त्यांनी सुरक्षित जागी ठिकाणा शोधला असावा. विजेच्या, केबलच्या तारा, झाडांच्या फांद्यांवर तुटलेले पतंग आणि त्यांचा मांजा लटकताना ठिकठिकाणी दिसून येत होता.





