पिंपरी : अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्ताला होणार्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर शहराच्या बाजारपेठांमध्ये फळांचा राजा आंबा दाखल झाला आहे. यामध्ये कोकणातून आता आवक झालेल्या आंब्यांची संख्या अधिक आहे. तर दरात काहीशी घसरण झाल्याने आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेल्या हापूसमुळे बाजारपेठेत आंबा खरेदी -विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. अखेर अक्षय तृतीयेसाठी फळांचा राजा बाजारपेठेत दाखल झाला आहे. एवढेच नाहीतर मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना हापूस आंब्याची चव चाखता आली आहे. अक्षय तृतीयेमुळे आवक वाढणार असा अंदाज व्यापार्यांनी बांधला होता. अखेर तो खरा ठरला असल्याने आंबा खवय्येंनाही अक्षय तृीतीयेच्या मुहूर्तावर चव चाखायला मिळत आहे. तर गेल्या आठ दिवसांपासून मोशी, पिंपरी उपबाजारांसह आंबा विक्रेत्यांकडे आंब्यांची आवक वाढली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरच दरात घटही झाली आहे. 800 ते 1 हजार रुपये डझन असलेला हापूस आता 500 ते 700 पर्यंत मिळाल्याने ग्राहकांमध्येही समाधान आहे. वाढत्या आवकचा दरावर परिणाम आंबा उत्पादनात घट झाल्यामुळे केवळ मुख्य बाजारपेठेतच आंब्याची आवक सुरु होती. त्यामुळे अक्षय तृीतेयानंतरच सर्वसामान्यांना आंब्याची चव चाखायला मिळणार असाच व्यापार्यांचा अंदाज होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दरात घसरण झाली आहे. त्याचा सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आता हेच दर कायम राहतील, असा अंदाज आहे. कोकणातूनच आवक वाढली उत्पादनात घट झाली तरी आहे त्या मालातूनच अधिकचा फायदा होण्याच्या दृष्टीने उत्पादकांनी गणिते मांडली होती. शिवाय अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तरी आंबा विक्री होईल या दृष्टीने नियोजनही करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील बाजारपेठांसह विक्रत्यांकडे कोकणातून आंबा दाखल होत आहे. याशिवाय कर्नाटक हापुसचीदेखील बाजारात चलती आहे.