Pimpri : डम्पिंग ग्राउंडला लवजी ग्रामस्थांचा तीव्र विरोध !

खालापूर : खोपोली नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक एक मधील लवजी ग्रामस्थांच्या २० एकर जागेवर डम्पिंग ग्राउंड आरक्षित केल्याने, लवजी व परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत डम्पिंग हटाव मोहीम सुरू केली आहे. यासंदर्भात गुरुवारी ग्रामस्थांनी नगरपरिषदेवर निषेध मोर्चा नेऊन डम्पिंग ग्राउंड विरोधात ग्रामस्थांची भूमिका असल्याचे निवेदन मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांना दिले आहे.
नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक एक लवजी व परिसरातील जागेवर डम्पिंग आरक्षित केल्याने या भागातील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या संदर्भात ग्रामस्थांनी दोन मार्चला ग्रामसभा घेऊन डम्पिंगला विरोध असल्याचा एकमुखी ठराव केला होता. या परिसरात शाळा, मंदिरे, पर्यटन स्थळे असतानाही नगर रचना विभागाने या भागात डम्पिंग आरक्षित केल्यामागे काय कारण आहे, असा सवाल ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारला आहे.
खोपोली नगरपरिषद हद्दीत यापूर्वीच मिल गावच्या हद्दीत डम्पिंग ग्राउंड असताना, तो त्या ठिकाणाहून हटवून लवजी परिसरात आणण्याचा काही धनदाडग्यांचा डाव असल्याची दबक्या आवाजात चर्चा नागरिकांमध्ये आहे.
ग्रीन झोन हटविल्याचा आनंद मावळला
डम्पिंगसाठी आरक्षित २० एकर जागेवर बहुतांश लवजी शेतकऱ्यांच्या जागा आहेत. गेल्या पंचवीस वर्षापासून या जागेवर ग्रीन झोन होता, अलीकडेच या जागेवरील ग्रीन झोन उठविण्यात आला. त्या जागी निवासी झोन करण्यात आल्याने शेतकरी आनंदित होते. परंतु अचानक तिथे डम्पिंगचे आरक्षण पडल्याने येथील ग्रामस्थांची झोप उडाली. ग्रामस्थांनी या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा निर्धार ग्रामसभेत केला.
डम्पिंग ग्राउंडमुळे स्वप्नांचा चक्काचूक
नियोजित डम्पिंग ग्राउंड जवळ पन्नास वर्षांपासून जेसीएमएम शाळा आहे. या डम्पिंगमुळे शाळा बंद होण्याच्या भीतीने पालकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. लवजी गावाचे रेल्वे स्थानक कर्जत-खोपोली मार्गावर आहे, खोपोली शहरानंतर झपाट्याने हा भाग विकसित होत आहे. मुंबईकर व पुणेकरांनी सेकंड मुंबई म्हणून या भागात फ्लॅट खरेदी केले आहे. डम्पिंग ग्राउंडमुळे त्यांच्या स्वप्नांचा चकाचूर होणार आहे. नगर रचना विभागाने तत्काळ डम्पिंग रद्द करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. सर्व ग्रामस्थ नगरपरिषदेसमोर उपोषणाला बसणार असल्याचे समीर शिंदे व किशोर पाटील यांनी सांगितले.
…अखेर मुख्याधिकारी आंदोलकांना भेटले
ग्रामस्थांच्या हरकतीचे निवेदन मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांना देण्यासाठी ग्रामस्थ नगरपरिषद ठिकाणी आले होते. मुख्याधिकारी पाटील यांनी शिष्टमंडळाला भेटण्यासाठी वेळही दिला, परंतु आपण दालनात निवेदन स्वीकारून अशी भूमिका मुख्याधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले व सर्वांनी उन्हामध्ये ठिय्या आंदोलन केले. अखेर माजी लोकप्रतिनिधींनी सांगितल्यानंतर मुख्याधिकारी यांनी आंदोलकांना प्रत्यक्ष भेटून निवेदन स्वीकारले.





