Pimpri : लोहगडाचा जागतिक वारसा स्थळात समावेश लवकरच

मावळ : लोहगड किल्यावरील कामांची खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी (दि. १७) पाहणी केली. किल्ल्यावरील बुरुजाची डागडुजी, पायऱ्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच लोहगडाचा लवकरच जागतिक वारसा स्थळात समावेश होईल, असा विश्वासही व्यक्त केला.
खासदार बारणे यांनी लोहगड किल्याला भेट दिली व गडावरील कामांचा आढावा घेतला. यावेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी गजानन मांढवरे, शिवप्रेमी प्रतिष्ठानचे सचिन टेकाळे, सरपंच सोनाली बैवरे, शिवसेनेचे पदाधिकारी शरदराव हुलावळे, राजेंद्र तरस, राम सावंत, अमित कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, लोहगड किल्याच्या पायथ्याशी शिवस्मारकाचे काम अर्धवट आहे. शिवस्मारकाचे काम पूर्णत्वास नेले जाणार आहे. किल्ले संवर्धन, सुशोभीकरण याबाबत केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि राज्याचे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेणार आहे. तसेच लवकरच किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश होणार आहे, असे सांगितले.
किल्ल्यावरील बुरुजाची डागडुजी, पायऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी केंद्र सरकारने अडीच कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीतून पुरातत्व विभागाने मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. किल्ल्यावरील बुरुजाची डागडुजी, पायऱ्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहे. लोहगडासह मावळात विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची किल्ले आहेत. त्यामुळे किल्यांवर पर्यटक मोठ्या संख्येने येतात. गड किल्ल्यांवर येणारे शिवप्रेमी, शिवभक्त, पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे बारणे यांनी सांगितले.





