Pimpri: मोशी डेपो कार्यन्वित होण्यास चार दिवस लागणार
Pimpri : मोशीतील डेपोतील दुर्घटनेनंतर ८ जुलैपासून शहरातून संकलित होणारा कचरा तेथे टाकणे बंद

पिंपरी – मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव तेथील कचरा टाकणे तात्पुरते थांबविण्यात आले आहे. कचरा डेपोतील घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया कार्यन्वित होण्यास आणखी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत पर्यायी जागेत व्यवस्था केली असून कचरा संकलन केले जात असल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.
मोशी कचरा डेपोमध्ये ८ जुलै २०२६ दुर्दैवी घटना घडली. अनेक कामगार कचऱ्याचा ढिगारा व पडलेल्या इमारतीखाली अडकले होते. चार दिवसांच्या बचावकार्यात एकूण २३ जणांना बाहेर काढले. त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला. हे सुरु असताना कचरा डेपोमध्ये कचरा टाकणे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
बचावकार्य संपल्यानंतर शहरातील घनकचरा व्यवस्थापन सुरळित करण्यासाठी मोशी डेपो कार्यन्वित करणे आवश्यक आहे. मात्र, कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार करण्याचे काम सुरु आहे. रस्त्यावरील कचरा हटविण्याचे काम सुरु आहे. हे संपूर्ण काम करून डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापन सुरळित करण्यासाठी आणखी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे.
या संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनीही नागरिकांना आवाहन करताना म्हटले आहे की, शहरातून दररोज संकलित होणारा सुमारे १ हजार ५०० टन कचरा आता मोशीऐवजी देहू, खडकी, एचए कंपनीची जागा त्याच बरोबर शहरातील सहा वेगवेगळ्या कचरा प्रक्रिया व हस्तांतरण केंद्रांवर वळविण्यात आला आहे. लोकवस्तीपासून दूर असलेल्या रिकाम्या जागांचाही वापर पालिकेने संकलनासाठी सुरु केला आहे. लवकरात लवकर डेपो सुरु करण्याची प्रक्रिया सुरु असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘मोशीतील डेपोतील दुर्घटनेनंतर ८ जुलैपासून शहरातून संकलित होणारा कचरा तेथे टाकणे बंद आहे. कचरा संकलन व घनकचरा व्यवस्थापन सुरळित करण्यासाठी आरोग्य व पर्यावरण विभागाकडून समन्वयाने प्रयत्न सुरु आहेत. मोशी डेपोतील परस्थितीचा आढावा घेतला असून डेपो पुर्ववत करण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागतील.’ -प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका





