Pimpri: कायदा विभागाच्या दालनावर बेकायदा अतिक्रमण; अतिरिक्त आयुक्तांचा कारभार

पिंपरी : महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी राखीव असणाऱ्या पदावर प्रतिनियुक्तीवर आलेल्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी कायदा विभागाच्या कार्यालयावर बेकायदा अतिक्रमण केले असल्याचा प्रकार समोर आला आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या तिसऱ्या मजल्यावरील दालनावर कब्जा केला होता. त्यामुळे महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
महापालिकेत अतिरिक्त आयुक्त क्रमांक एक आणि दोन ही दोन पदे शासनाकडून प्रतिनियुक्तीवर नियुक्त केली जातात. अतिरिक्त आयुक्त क्रमांक तीनचे पद महापालिका आस्थापनेवरील अधिकाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठी आरक्षित आहे. मात्र, त्या एकमेव जागेवरही शासनाने सांडभोर यांची प्रतिनियुक्तीवर नेमणूक केली आहे. त्यास विरोध असतानाही महापालिका आयुक्तांनी त्यांना रुजू करून घेतले आहे. त्याला कर्मचारी महासंघाने विरोधही दर्शवला होता.
सुरुवातीस अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांच्या तिसऱ्या मजल्यावरील दालनावर अधिकार सांगत त्यांनी न सांगताच कब्जा केला. शनिवारी (दि. ३१ मे) महापालिकेचे सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडे नगरसचिव आणि कायदा विभागाचा पदभार होता. त्यांचे दालन चौथ्या मजल्यावर होते. ते सेवानिवृत्त होताच सांडभोर यांनी कायदा विभागाचे दालन ताब्यात घेतले.
दालन समिती नावालाच
महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांना कोणते दालन द्यायचे, यासाठी समिती नेमण्यात आली आहे. तिचे अध्यक्ष आयुक्त आहेत. शहर अभियंता, प्रशासन विभाग प्रमुख, मुख्य लेखा व वित्त विभाग प्रमुख सदस्य आहेत. मागील वर्षी मुख्य अभियंता तसेच सहशहर अभियंता यांच्या दालनाचा वाद आयुक्त शेखर सिंह यांच्यापर्यंत गेला होता. त्यानंतर स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांना दालन वाटप करण्यात आले होते. आता तसाच प्रकार घडल्याने समिती कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
अतिरिक्त आयुक्तांनी कोणते दालन घ्यायचे, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, दालन समितीने नेमून दिलेल्या दालनाचाच वापर करणे त्यांना क्रमप्राप्त आहे. समितीकडे हा विषय आल्यावर त्यावर निर्णय देण्यात येईल.
– मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका





