Pimpri : हड…! मी नाही ते पाणी पिणार

पिंपरी : बाळा नांदगावकर माझ्याकडे कमंडलूमध्ये गंगेचे पाणी घेऊन आले. म्हणाले साहेब हे घ्या गंगेचे पाणी प्या. मी म्हटलं हड…मी नाही ते पाणी पिणार अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याची खिल्ली उडवली. मनसेचा १९ वा वर्धापन दिन चिंचवड येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबई येथील मेळाव्याला अनुपस्थित असलेले पदाधिकारी कुंभमेळ्याल्या गेल्याचे सांगत कुंभमेळ्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
याव्ठाकरे म्हणाले, काही दिवसांपूर्वी मुंबईला एक मेळावा पार पडला. त्यासाठी काही पदाधिकारी अनुपस्थित होते. त्यांची हजेरी घेतली. त्यांना विचारले की काय कारण होते. प्रत्येकाने वैद्यकीय अडचणी सांगितल्या. तर पाच-सहा जणांनी कुंभमेळाव्याला गेलो असल्याचे सांगितले. कळत नाही लोक इतकी पापे करतातच कशाला? त्याचवेळी बाळा नांदगावकर माझ्याकडे आले, म्हणाले साहेब गंगेच पाणी आणलयं प्या. आपण सोशल मिडीयामध्ये पाहतोय त्या गंगेची अवस्था. कुंभमेळ्यात माणस, बाया त्याठिकाणी अंघोळ करतात. ते पाणी पिऊ का? आताच करोना गेला. दोन वर्ष तोंडाला फडकी बांधून फिरत होतो. आता तिकडे जाऊन अंघोळ करतात. अतिशय वाईट अवस्था झाली आहे त्या गंगा नदीची. देशातील एकही नदी स्वच्छ नाही.
ते म्हणाले , परदेशातील नद्या जाऊन पहा एकदम स्वच्छ आहेत. तिकडचे लोक नदीला माता म्हणत नाहीत. तरीही नद्या स्वच्छ आहेत. राजीव गांधी पंतप्रधान असल्यापासून गंगा साफ होणार आहे. मध्यंतरी राज कपूरने चित्रपट देखील काढला. लोकांना वाटल झाली गंगा साफ. त्यामध्ये वेगळीच गंगा होती. चित्रपट बघितल्यानंतर लोक म्हणाली अशी गंगा असेल तर आम्ही अंघोळ करायला तयार आहे. लोकांनी नदीमध्ये काय केलं असेल ते आपण प्यायचे? या श्रद्धेला काही अर्थ आहे का नाही? या श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधून बाहेर येण्याचा सल्ला ठाकरे यांनी दिला.





