Pimpri : देहू संस्थानचा ऐतिहासिक निर्णय !

देहूगाव : श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानने श्री संत तुकाराम महाराज आषाढी पायी वारी सोहळ्यातील चौघडा, चांदीचा पालखी रथ ओढण्यासाठी स्वत:च्या मालकीची बैलजोडी खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदापासून पालखी रथ ओढण्यासाठी शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांना मान देण्याची प्रथा खंडित होणार आहे. पालखी नियोजनात बदल म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून १८ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पालखी सोहळ्याची तयारी संस्थानकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराज संस्थानची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये संस्थानच्या निकषात बसतील, अशा दोन बैलजोड्या श्री संत तुकाराम महाराज पालखी रथासाठी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरवर्षी तुकोबांच्या पादुका पंढरपूरला जाण्यासाठी पालखी रथात विराजमान होतात. हा रथ ओढण्यासाठी पुणे जिल्ह्यातून विविध बैलजोड्यांना मान दिला जात होता. मात्र, यंदा बैलजोडी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाराजीचा प्रश्न उरणार नाही…
याआधी पालखी रथाच्या बैलजोड्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन देहू देवस्थान संस्थानच्या वतीने करण्यात येत असे. त्यानुसार, इच्छुक बैलगाडा मालक, शेतकरी आपल्या बैलजोड्या जुंपण्यासाठी अर्ज करायचे. त्यातून देवस्थानकडून बैलजोड्यांची निवड करण्यात येत होती. त्यावरून अनेक बैलमालक नाराज व्हायचे. त्यामुळे संस्थान स्वत:च बैलजोड्या विकत घेणार असल्याने कोणीही अर्ज करू नये, असे आवाहन संस्थानने केले आहे.
अठरा जून रोजी पालखीचे प्रस्थान
यंदा रविवार, ६ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. यानिमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी १८ जून रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे देहू संस्थानकडून या सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या बैठकीत संस्थेच्या आवश्यकतेनुसार दोन सशक्त बैलजोड्या पालखी रथासाठी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याव्यतिरिक्त चौघड्याच्या गाडीसाठी देखील एक सर्वसाधारण बैलजोडी खरेदी केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
देवस्थान पालखी रथासाठी दोन आणि चौघडा गाडीसाठी एक अशा तीन बैलजोड्या खरेदी करणार आहे. पालखी रथाला जोडण्यासाठी कोल्हापूर, सातारा आणि कर्नाटकच्या बाजारपेठेत जाऊन बैलांची पाहणी करून तीन जोड्या विकत घेतल्या जाणार आहेत. या बैलजोड्या शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणार आहेत. बैलांचा सांभाळ देवस्थान करणार आहे.
– जालिंदर महाराज मोरे, अध्यक्ष, जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान, देहूगाव





