Pimpri : मुसळधार पावसाने रस्त्याचे झाले तळे

खालापूर : राज्यावर सध्या अवकाळी पावसाचे संकट आहे. खालापूर तालुक्यातही गेली आठवडाभरापासून अवकाळीचे वातावरण असून ठिकठिकाणी पाऊस कोसळत आहे. दोन दिवसांपूर्वीच खोपोली शहराला वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. कमी वेळेत झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे शास्त्रीनगर येथील गिरनार इमारतीसमोरील रस्त्यावर तळ्यासारखे पाणी साठले होते. या दृश्यामुळे नगरपरिषदेने पावसाळापूर्व केलेल्या व सुरू असलेल्या नालेसफाईचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
खोपोली शहरातील शास्त्रीनगर परिसरातील युनियन बँक, गिरनार बिल्डींग आदी भागातील रहिवाश्यांच्या घरांतील सांडपाणी वाहून नेण्यासाठी महामार्गालगत मुख्य ड्रेनेज लाइन आहे. ही ड्रेनेज लाइन कचरा अडकल्यामुळे जवळपास बंदच झाली आहे. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात या गटारातील सांडपाणी रस्त्यावर येते आणि गिरनार बिल्डिंगच्या पार्कींगमध्ये, भाऊ कुंभार चाळीत शिरते. कधी कधी या भागात पूर आलाय की काय, अशी स्थिती भासते. नुकत्याच झालेल्या मुसळधार अवकाळी पावसातही गिरनार इमारतीसमोरील ड्रेनेज लाइन तुंबून हे पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्याचे तळे बनले होते.
खोपोली शहरात पावसाळ्यात नाले-गटारे तुंबून पूरस्थिती निर्माण होवू नये याकरिता खोपोली नगरपरिषद आरोग्य व बांधकाम विभागाच्या माध्यमातून विविध प्रभागातील लहान-मोठी गटारे नाले, सफाईचे काम दरवर्षी हाती घेत असते. यंदाही शहरातील नालेसफाई सुरू केली आहे. परंतु दोन दिवसांपूर्वीच्या या घटनेने पालिकेची नालेसफाई कुठे सुरू आहे, हा प्रश्न खोपोलीकरांना पडला आहे.





