Pimpri : उन्हाचा तडाखा, ‘बत्ती गुल’चा फटका

कर्जत : मार्च-एप्रिल महिन्यापासूनच कडक उन्हाळा जाणवायला सुरुवात झाली. त्यामुळे साहजिकच विजेची मागणी वाढली. गरमीपासून संरक्षणासाठी नागरिकांकडून एसी, कुलर, पंखे यांच्या वापरात वाढ होत असल्याने विजेची मागणी वाढली आहे. परंतु याच काळात विद्युत प्रवाह वारंवार खंडित होत असल्याने कर्जत विभागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. यामुळे संतप्त नागरिकांनी महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महावितरणच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सामान्य नागरिकांना बसत असून उष्म्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण विरोधात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. लाइन फिडरवर वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने तासनतास वीजपुरवठा खंडित होत आहे.
कर्जत तालुक्यामध्ये महावितरण विभागाचे सत्तर हजारांहून अधिक ग्राहक आहेत. कळंबोली, खोपोली असे दोन फिडर आहेत आणि आठ शाखा आहेत. कर्जत, दहिवली, दहिवली एक, कडाव, कळंब, नेरळ एक, नेरळ दोन, माथेरान असे सेक्शन आहेत. मात्र या फिडरवर कायम तांत्रिक बिघाड होत असतो. यामुळे रात्री अपरात्री तासनतास विद्युत पुरवठा खंडीत होतो, याचा थेट परिणाम उद्योग, व्यवसाय, कारखाने यांसह सामान्यांच्या जीवनावर होत आहे.
परिसरातील विद्युत पुरवठा विनाव्यत्य सुरु राहावा, यासाठी कर्जत बचाव समितीच्या वतीने अनेकदा महावितरणकडे पत्रव्यवहार करण्यात आला. यापूर्वी उपोषणाचे हत्यार देखील वापरण्यात आले. परंतु महावितरणच्या कार्यप्रणालीत अपेक्षित सुधारणा होताना दिसत नाही. विज बिल वसुलीसाठी महावितरण विभाग धडक मोहिमा राबवित असते, परंतु विजेचा पुरवठा सुरळीत सुरू राहावा, यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना करताना विभाग दिसत नाही, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहे.





