Pimpri : हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात : केशरचा हंगाम सुरू

पिंपरी : आंबा बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून, केशरचा हंगाम सुरू झाला आहे. हापूस शेवटच्या टप्प्यात असून, दर कमी झाले आहेत.
मागील आठवडाभरापासून जिल्हाभरात वादळी वार्याची परिस्थिती असली तरी आंबा मार्केट चांगलेच सजलेले आहे. सध्या शहरातील आंबे बाजारात विविध प्रकारच्या आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल 20 ते 30 रुपयांनी कमी झाल्याचे चित्र आंबे बाजारात पहावयास मिळत आहे. सध्या केशरचा हंगाम सुरू झाला असून तो 100 ते 150 रुपये प्रतिकिलो दरामध्ये मिळत आहे.
शहर परिसरातील आंबे बाजारात सध्या विविध प्रकारचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहेत. यामध्ये मराठवाड्याचा केशर, हापूस, बदाम, लालबाग, मलिका, आम्रपाली, रत्ना, तोतापुरी, लंगडा, पायरी या मुख्य वाणांचा समावेश आहे. याशिवाय गावरान गोटी आंब्यांचीही चांगलीच चलती आहे.
आवक चांगली झाल्याने या सर्वच प्रकारच्या आंब्याचे दर कमी झाले आहेत. हे आंबे किरकोळमध्ये 80 ते 100 रुपये प्रति किलो तर चांगल्या प्रतीचा आंबा 120 ते 150 रुपये प्रति किलो दराने सुरू आहे.
हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात
सध्या शहरात चांगल्या प्रतीचा हापूस आंबा 500 रुपये प्रति डझन असा भाव आहे. हापूसचा हंगाम हा अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच वादळी वारे झाल्याने भावही कमी होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
जून अखेरपर्यंत मिळणार केशर
केशर हंगाम हा जून अखेरपर्यंत राहील. तर आंध्र प्रदेशातील तोतापुरी आंबा हा जुलै अखेरपर्यंत चालतो. सिंधुदुर्गचा हापूस हा 500 ते600े रुपये प्रतिडझन विक्री होत असून तो मे अखेरपर्यंत विक्री होईल. मात्र या कालावधीत अधिक पाऊस झाला तर लवकरच हा हंगाम संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
अवकाळीचा आंब्यांनादेखील फटका
मागील काही दिवसांत मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी वार्यासह गारपीट, अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे मराठवाड्यातील आंब्यांचे नुकसान झाले. वार्याचा वेगावर, गारपिटीच्या तीव्रतेवर आंबा गळीचे नुकसान होते. तोतापुरीचे देठ मात्र परिपक्व अवस्थेत असल्याने अधिकचे नुकसान झाले नाही, परंतु केशरचा ऐन हंगाम असल्याने अधिक नुकसान झाले.





