Pimpri : कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील

पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात लहान उद्योगांच्या माध्यमातून अनेक कामगारांना रोजगार प्राप्त होत आहेत. या कामगारांच्या समस्या आणि लहान उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.पुणे सातारा चेंबर ऑफ कॉमर्स तसेच पुण्यातील श्रमिक, कामगार आणि उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
निगडीतील ग.दि. माडगुळकर नाट्यगृहात शुक्रवारी (दि.9) पार पडलेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले, वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक पंडीत, गणेश दरेकर, पुणे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष विजय सोनावले, संस्थापक अरुण कांबळे आदी उपस्थित होते.पर्यटन मंत्री देसाई म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. लोकांसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात आलेला श्रम महर्षी पुरस्कार त्यांच्यावतीने पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी स्वीकारला. तसेच यावेळी यशवंत भोसले यांना श्रम योगी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविकात विजय सोनावले यांनी पुणे सातारा चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेच्या कार्याची माहिती विषद केली. कार्यक्रमाला या परिसरातील उद्योजक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कामगार उपस्थित होते.





