Pimpri : हिंजवडी आयटी विकासासाठी दहा हजार कोटींचे पॅकेज द्या

पिंपरी : विकसनशील आयटी पार्कच्या मूलभूत सुविधेच्या पूर्तीसाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी ग्रामविकास मुळशी तालुका संस्थेचे अध्यक्ष अंकुश जगताप यांनी केली आहे.
पीएमआरडीएचे महानगर आयुक्त योगेश म्हसे यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. त्यात जगताप यांनी म्हटले आहे की, हिंजवडी, माण, मारुंजी गावांना दहा हजार कोटी तर लगतच्या नेरे (दत्तवाडी), कासारसाई, चांदे, घोटावडे, कुसगाव, चांदखेड, दारुंब्रे, गहुंजे या गावांसाठी प्रत्येकी दोन हजार कोटींचे विशेष ‘पॅकेज’ द्यावे.
आयटी परिसरातील असुविधांसाठी ग्रामपंचायतींना दोष दिला जातो. यापूर्वी एमआयडीसी, महसूल विभाग, पीएमआरडीए यांनी हिंजवडी, माण, मारुंजी, जांबे गावात सार्वजनिक हिताच्या रस्त्यांची मुस्कटदाबी जाणीवपूर्वक केली.
विशेष पॅकेज दिले तर लोकांच्या समस्या सुटतील. शेतकऱ्यांभोवती षडयंत्रचा फास सुटेल. नगरपालिका, नगरपरिषदवरून यापूर्वी एकमेकांवर झालेले चिखलफेकीचे राजकारण कायमचे थांबेल, असेही जगताप यांनी निवेदनाद्वारे सूचित केले आहे.





