Pimpri : जादा परताव्याच्या आमिषाने १ कोटी १० लाखांची फसवणूक

पिंपरी : डब्ल्यूएफएक्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कंपनीत गुंतवणूक केल्यास १५ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून नागरिकांची १.१० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार दिघी येथे उघडकीस आला. हा प्रकार ९ डिसेंबर २०२२ ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घडला आहे.
याप्रकरणी एका महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन कोलते, त्याची पत्नी आणि वडील अविनाशराव कोलते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला डब्ल्यूएफएक्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कंपनीत गुंतवणूक केल्यास १५ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. महिलेला ८० लाख रुपये गुंतवणूक करण्यात भाग पाडले.
महिलेला सुरुवातीला सहा महिने एकूण ९ लाख २९ हजार रुपये परतावा देण्यात आला. त्यानंतर मागणी करून देखील महिलेला त्यांचा परतावा अथवा गुंतवणूक केलेली रक्कम परत केली नाही.
आरोपींनी फिर्यादी महिलेप्रमाणेच इतर लोकांकडून देखील पैसे घेऊन एकूण एक कोटी १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपी त्यांचे घर सोडून निघून गेले आहेत. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





