Pimpri : विजेचा धक्क्याने पाच भटक्या श्वानांचा मृत्यू

पिंपरी : कामगार नगर, खराळवाडी आणि संत तुकाराम नगर येथे सोमवारी (दि. १९) रात्री साडे नऊच्या सुमारास घडलेल्या दोन दुर्दैवी घटनांमध्ये ठेकेदाराच्या बेजबाबदारी आणि महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे पाच भटक्या श्वानांचा मृत्यू झाला. या घटनेतील जबाबदारांविरोधात तात्काळ कारवाईची मागणी होत आहे.
याबाबत अॅड. प्रज्वल दुबे यांनी सांगितले की, खराळवाडीतील दुर्घटनेत एमएनजीएल गॅस पाइपलाइनच्या कामासाठी खराळवाडी येथे रस्त्यालगत खणलेले खड्डे उघडेच ठेवण्यात आले. कोणत्याही सुरक्षाव्यवस्थेचा अभाव, सूचना फलक किंवा अडथळ्यांचा वापर न केल्याने जोरदार पावसानंतर खड्ड्यांमध्ये पाणी साचले. या पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने चार भटक्या श्वानांचा मृत्यू झाला.
त्याच दिवशी संत तुकाराम नगर येथे डी.वाय.पाटील हॉस्पिटलजवळ असाच एक उघडा खड्डा ठेकेदाराने सुरक्षाव्यवस्था न करता सोडला होता. येथे साचलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने एक भटका श्वान मृतावस्थेत आढळला. तसेच, या श्वानाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुशील महादेव मोरे यांनाही विजेचा धक्का बसला.
गुन्हा नोंदवण्याची मागणी
याबाबत ॲड. प्रज्वल दुबे यांनी पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करत ठेकेदार आणि संबंधित महापालिका अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. तसेच, मृत श्वानांचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) करून मृत्यूचे कारण स्पष्ट करण्याची आणि त्वरित एफआयआर दाखल करण्याची मागणीही केली आहे. ॲड. दुबे हे संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता, “श्वानांचा मालक नाही” असे कारण देत तक्रार नोंदवण्यास नकार दिला. मात्र, यापूर्वी उच्चभ्रू परिसरातील अशा घटनांमध्ये तात्काळ एफआरआय नोंदवण्यात आल्याचे अॅड. दुबे यांनी म्हटले आहे.





