Pimpri : वृक्ष पुनर्रोपणाची धुरा पाच ठेकेदारांवर

पिंपरी : विविध कारणांमुळे शहराच्या विविध परिसरातील पूर्ण वाढ झालेली झाडे काढल्यानंतर अथवा उन्मळून पडलेल्या झाडामचे पुनर्रोपण करण्याचे महापालिकेच्या उद्यान विभागाने मनावर घेतले आहे. त्याकरिता शहराच्या हद्दीतील वृक्षांचे पुनर्रोपण करण्यासाठी पाच ठेकेदारांची दोन वर्षांकरिता नेमणूक केली जाणार आहे.
महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांमध्ये नवनवीन विकास प्रकल्प राबविले जात आहेत. यामध्ये डेअरी फार्म येथील उड्डाणपूल, निगडी प्राधिकरणातील नियोजित अग्निशमन विभागाची इमारत, नदी सुधार प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पूर्ण वाढ झालेली शेकडो झाडे काढली जात आहेत; तर शेकडो पुनर्रोपणासाठी पात्र असलेल्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची शिफारस केली जाते.
याशिवाय खासगी जमिनीवर इमारत बांधण्यासाठी अथवा अन्य कारणांसाठी वृक्षतोड करण्याची परवानगी महापालिकेच्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाकडे मागितली जाते. याठिकाणची स्थळ पाहणी करून सदर वृक्ष पूर्णपणे काढून टाकणे, फांद्या छाटणे अथवा पुनर्रोपण करण्याची शिफारस या विभागाच्या समितीकडून केली जाते. वृक्षांच्या पुनर्रोपणाकरिता दोन वर्षांचा नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाने ठरविले आहे. त्याकरिता वृक्षा पुनर्रोपणाचा अनुभव असलेल्या ठेकेदारांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती स्थापन केली जाणार आहे. त्याकरिता इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
महापालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या नियंत्रणाखाली पाच ठेकेदारांची वृक्ष पुनर्रोपणासाठी नेमणूक केली जाणार आहे. उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाने शिफारस केलेली पुनर्रोपणासाठीची झाडे किंवा उन्मळून पडलेली झाडे यांच्या पुनर्रोपणाची जाबबदारी या तज्ज्ञ ठेकेदारांवर असणार आहे.





