Pimpri : कोचिंग क्लासेसमध्ये आग सुरक्षेचा प्रश्न गंभीर; केवळ ३८ शाळांकडेच अग्निसुरक्षा प्रमाणपत्र

संदीप घिसे
पिंपरी – पिंपळे सौदागर येथील बहुमजली इमारतीतील कोचिंग क्लासला सोमवारी लागलेल्या आगीच्या घटनेत अग्निशामक दलाच्या जवानांनी सहा जणांची थरारक सुटका केली. जीवितहानी टळली असली, तरी या घटनेने शहरातील कोचिंग क्लासेसमधील अग्निसुरक्षेची स्थिती किती दयनीय आहे, याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
केवळ कोचिंग क्लासेसच नव्हे तर अनेक शाळांकडे देखील अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लाखो मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या शाळा-क्लासेसबाबतीत महापालिका प्रशासनाने डोळे झाकून घेतले आहेत का? असा प्रश्न उपस्िथत होत आहे.
शहरात एकूण ६८० शाळा असून, त्यापैकी केवळ ३८ शाळांकडेच अग्निसुरक्षा प्रमाणपत्र आहे, ही वस्तुस्थिती हादरवणारी आहे. १६९ शाळांनी फायर सेफ्टी कंप्लायन्ससाठी अर्ज केले असले, तरी ११७ अर्ज प्रलंबित असून योग्य त्या उपाययोजना न केल्याने १५ अर्ज अग्निशामक विभागाने नाकारले आहेत.
शाळांची स्थिती इतकी बिकट असेल, तर कोचिंग क्लासेसचे काय, असा सवाल आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे. कारण, शहरात किती कोचिंग क्लासेस चालतात, त्यांच्या इमारती सुरक्षित आहेत का, तेथे फायर ऑडिट झाले आहे का, याबाबत महापालिका पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे अधिकाऱ्यांनीच कबूल केले आहे.
कोचिंग क्लासेसमध्ये आग लागल्यास होणारी जीवितहानी प्रचंड असू शकते. लहान मुले आणि किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे त्यांचे सुरक्षित बाहेर काढणे हे अतिशय आव्हानात्मक कार्य ठरते. अरुंद जागा, गर्दी, एकच प्रवेशद्वार, अडथळ्यांनी भरलेले जिने, विजेच्या तारा, इन्व्हर्टर, प्रोजेक्टर, संगणक यामुळे शॉर्टसर्किटची शक्यता मोठी असते.
अशा परिस्थितीत फायर ऑडिट आणि फायर सेफ्टी कंप्लायन्स सर्टिफिकेट घेणे अत्यावश्यक असताना कोचिंग क्लासेसमधील बहुसंख्य संस्थांनी त्याकडे काणाडोळा केला आहे. तज्ज्ञांच्या मते, अग्निसुरक्षेसाठी फायर एक्स्टिंग्विशर, स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म सिस्टम, इमर्जन्सी लाइट्स, ए.िक्झट सिग्नेज, फर्स्ट एड किट, इव्हॅक्यूएशन प्लॅन, प्रशिक्षित कर्मचारी आणि नियमित मॉकड्रील हा किमान दर्जा आहे.
या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यास अपघात होण्याची शक्यता वाढतेच, शिवाय कायदेशीर कारवाई, दंड, क्लास बंद होणे आणि गुन्हा नोंदवला जाण्याचा धोका देखील संभवतो.
आग लागल्यावर प्रतिक्रिया देणे सोपे नसते; प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे असतात, असा इशारा अग्निसुरक्षा तज्ञ देत आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही आता जागरूकता वाढत असून, फायर सेफ्टी प्रमाणपत्र असलेल्या क्लासेसची निवड करण्याचा कल वाढला आहे. सुरक्षित वातावरण देणाऱ्या संस्थांचा विश्वास वाढतो, प्रतिष्ठा उंचावते आणि प्रवेशसंख्या वाढण्यास मदत होते, हे वास्तव नाकारता येणार नाही.
पिंपळे सौदागर येथील घटनेनंतर पालिका आणि संबंधित विभागांची झोप उडाली असली, तरी केवळ नोटिसा देऊन जबाबदारी पूर्ण होत नाही. प्रायव्हेट कोचिंग क्लासेससाठी फायर ऑडिट अनिवार्य करणे आणि प्रमाणपत्राशिवाय वर्ग सुरू करू न देणे ही काळाची मागणी आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यावर जबाबदार कोण, हा प्रश्न पालक, जनता आणि कायदा, तिघांनाही विचारावा लागेल.
सध्याच्या परिस्थितीने एकच संदेश स्पष्ट केला आहे की, शिक्षण संस्था सुरक्षित नसतील, तर शिक्षण कितीही उच्च दर्जाचे असले तरी त्याला काही अर्थ राहात नाही. आता महापालिकेने तातडीने पावले उचलली नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एक दिवस शहरासाठी मोठा संकटकाळ ठरू शकतो.
याकडे हवे लक्ष
– कोचिंग क्लासेसमध्ये अग्निसुरक्षा धोका
– महापालिकेची फायर तपासणी अपुरी
– विद्यार्थी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न
– फायर ऑडिट अनिवार्य करण्याची गरज
– फायर सेफ्टी साधनांची कमतरता
– शाळांचे अग्निप्रमाणपत्र अत्यल्प प्रमाणात
– इलेक्ट्रिकल धोक्यांकडे दुर्लक्ष होते
– आपत्कालीन बाहेर पडण्याचा अभाव
– मॉकड्रीलची अंमलबजावणी नाही
– पालकांचा सुरक्षिततेवर वाढता आग्रह
अर्ज प्राप्त – प्रमाणपत्र प्रदान- प्रलंबित प्रकरणे- नाकारलेले अर्ज
- अनुदानित शाळा – २४ – ०३ – १८ – ०६
- विना अनुदानित शाळा/महाविद्यालय – १३८ – ३५ – ९१ – १२
- शासकीय / निमशासकीय आस्थापना – ०५ – ०० – ०५ – ००
- बालसंगोपन केंद्र – ०० – ०० – ०० – ००
- बालवाडी/नर्सरी – ०२ – ०० – ०२ – ००
- कोचिंग क्लासेस – ०१ – ०० – ०१ – ००
एकूण १७० ३८ ११७ १५





