<p style="text-align: left;"><strong>पवनानगर : </strong>शॉर्ट सर्किटमुळे घरात अनेक ठिकाणी आग लागल्याची दुर्घटना तुंग गावात घडली. आगीत घरातील साहित्यांसह जनावरांचा चारा जळून खाक झाल्या असल्याची माहिती पीडित कुटुंबीयांनी दिली. ऐतिहासिक किल्ले तुंगच्या पायथ्याशी असणाऱ्या तुंग गावचे माजी सरपंच राणू बबन खराडे यांच्या घरात शुक्रवारी ही आग लागली होती.</p> <p style="text-align: left;">घरात आग लागल्याचे समजताच कुटुंबीयानी घराबाहेर धाव घेतल्याने सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. शेजारील नागरिकांच्या मदतीने सर्वांनी आग विझविली. परंतु तोपर्यंत घरातील काही साहित्य, धनधान्ये व जनावरांसाठी साठविलेला पेंढा आगीत जळून खाक झाला. साधारण चार हजार पेंढा आगीत जळाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.</p> <p style="text-align: left;">आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच ग्रामसेवक अप्पा भानवसे यांनी दुसऱ्या दिवशी सदर ठिकाणी जात पाहणी केली व गावकामगार तलाठी यांना घटनेची माहिती दिली.</p> <p style="text-align: left;">