Pimpri : ‘निर्भीड पत्रकारितेची आजही गरज’

वडगाव मावळ : आद्य मराठी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेल्या निर्भीड पत्रकारितेची आजही गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. न.म. जोशी यांनी तळेगाव दाभाडे येथील कार्यक्रमात केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या २१३व्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. जोशी “पत्रकारिता कालची आजची आणि उद्याची” या विषयावर बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे, भाजपाचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल पवार, सचिव सोनबा गोपाळे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात पत्रकार संघाचे संस्थापक सुरेश साखवळकर यांनी बाळशास्त्रींच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ. न.म. जोशी म्हणाले, अग्रलेख वृत्तपत्राचा चेहरा आहे, बाकीचे सदरे अवयव आहेत. पूर्वी अग्रलेखांमधून संपादक वास्तववादी लिखाण करत समाजाचे प्रबोधन करत असत, असेही डॉ जोशी यांनी सांगितले.
स्वागत अतुल पवार यांनी केले. सोनबा गोपाळे यांनी प्रास्ताविक, राजेश बारणे यांनी सूत्रसंचालन, गणेश बोरुडे यांनी परिचय करून दिला. प्रभाकर तुमकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोहर दाभाडे, बी एम भसे, सुनील वाळुंज, तात्यासाहेब धांडे आदींनी परिश्रम घेतले.





