Pimpri : मावळात कृषी प्रकल्पांची उभारणी करा; आमदार सुनील शेळके यांची आग्रही मागणी

मावळ : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मावळ तालुक्याच्या कृषी विकासावर लक्ष केंद्रीत करत आमदार सुनील शेळके यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण मागण्या मांडल्या.
मावळ तालुक्यात शीतगृह, सेंद्रीय शेती, इंद्रायणी तांदूळ आणि गुलाब फुलांवर प्रक्रिया करणारी केंद्रे उभारण्यासाठी आवश्यक जागा स्थानिक शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार शेळके यांनी कृषीमंत्र्यांकडे केली.
मावळ तालुक्याला या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा. जिल्हास्तरीय स्वतंत्र आढावा बैठक घेऊन मावळ तालुक्याचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी विनंती आमदार शेळके यांनी कृषिमंत्र्यांकडे केली. तसेच स्मार्ट प्रोजेक्टमध्ये जे प्रस्ताव मंजूर झाले आहेत, त्यांना वेळेत निधी वितरित व्हावा आणि यासाठी टाईम आऊट मिळावा, अशीही सूचना त्यांनी केली.
या बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, प्रकल्प संचालक हेमंत वसेकर, राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव, कृषी विभागाचे संचालक, विविध विभागांचे अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.
कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन या प्रकल्पांतर्गत राज्यात १२५० कृषी प्रकल्प मंजूर असून त्यापैकी ५५० प्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहेत. यामध्ये धान्य गोदाम, कांदा चाळ, शीतगृह, राइस मिल, ऑइल मिल, पशुखाद्य युनिट यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ३० टक्के प्रकल्प महिला शेतकरी भगिनींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे मोठे पाऊल ठरत आहे.
मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळण्यास या प्रकल्पांमुळे मदत होणार असून स्थानिक आर्थिक व्यवहारांनाही चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांना साठवणूक, प्रक्रिया आणि विक्रीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल.
– सुनील शेळके, आमदार, मावळ





