Pimpri : फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांसाठी मोठा पेच

पिंपरी : भोसरी पीएमटी चौक परिसरात एका बस थांब्यावरून दुसऱ्या बस थांब्याकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिसरातील पादचाऱ्यांचे मार्ग फेरीवाल्यांनी अडवले आहेत. पदपथावर व्यवसाय थाटल्याने नागरिकांना रस्त्यावरूनच चालावे लागत आहे. त्यामुळे “पादचाऱ्यांनी नक्की जायचं कुठून?” हा सवाल उपस्थित होतो आहे.
या त्रासात भर म्हणून अचानक पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर जागोजागी पाणी साचते. त्यामुळे नागरिकांची फरफट अधिकच वाढत आहे. वर्षानुवर्षे हीच स्थिती असूनही महापालिकेकडून फारशी ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. अतिक्रमणविरोधी मोहिमा होत असल्या तरी त्या तात्पुरत्याच ठरत आहेत.
महापालिकेने फेरीवाल्यांसाठी पर्यायी गाळे उपलब्ध करून दिले आहेत. मात्र काही फेरीवाल्यांना जागा न मिळाल्याने ते पुन्हा रस्त्यावरच व्यवसाय करताना दिसतात. परिणामी पादचाऱ्यांचे हाल सुरूच आहेत, तर फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न कायम आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना महापालिकेकडून अपेक्षित आहे.





