Pimpri : मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता

पिंपरी : ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयात आमचे सबमिशन सुरू आहे, त्यानुसार सर्वोच्च न्यायालय त्याला मान्यता देईल. ओबीसी आरक्षणासंदर्भात फेब्रुवारीमध्ये निकाल झाला, तर मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. अनेक दिवस स्थानिक स्वराज्य संस्था रिकाम्या राहू नयेत. लवकरच या निवडणुका झाल्या पाहिजेत. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती महसूलमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
बावनकुळे यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे शनिवारी (दि.8) उद्घाटन झाले. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बावनकुळे यांनी क्रिकेटच्या मैदानावर चौफेर फटकेबाजीही केली. पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक भाजप स्वबळावर लढविणार का असे विचारले असता, ते म्हणाले. राज्य पातळीवर महायुती म्हणून आम्ही एकत्रित निवडणुकांना सामोरे जात आहोत. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाच्या की नाही, याबाबत स्थानिक युनिटला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल.
तसेच पक्ष व भाजपच्या मंत्र्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी तसेच होणारे निर्णय सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपचा कार्यकर्ता असावा, याकरिता प्रत्येक मंत्र्यांकडे भाजप कार्यकर्त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे निर्णय आम्ही घरोघरी पोहचवू शकतो, हा त्यामागील उद्देश आहे.
बावनकुळेंचे थेट राहुल गांधीना आव्हान
कामठी विधानसभा निवडणुकीत सलग पाच वेळा भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. राहुल गांधी म्हणतात की, कामठी विधानसभेच गडबड झाली आहे. त्यामुळे माझे राहुल गांधी यांना आव्हान आहे की, 2029 ची विधानसभा निवडणूक त्यांनी माझ्या विरोधात लढवावी. असे थेट आवाहन बावनकुळे यांनी राहुल गांधींना दिले असून मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढून जिंकून दाखवेन. आमचे कार्यकर्ते प्रामाणिक आहेत. ते जर लढायला तयार झाले तर मी त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.





