Pimpri : एकविरा देवी मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलला

कार्ला : शनिवार, रविवार सलग सुट्टीचे दिवस असल्याने कार्ला येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते. गडमाथा आणि पायथा भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. वाहनांची संख्या वाढून भाविकांच्या गर्दीमुळे भक्तांचा महापूर आल्याचे भासत होते.
मावळातील निसर्ग बहरल्याने कार्ला, लोणावळ्यासह परिसरात निसर्ग पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. वीकेंडमुळे पुणे, मुंबई, ठाणे भागातून पर्यटक आले होते. वाहनांचीही संख्या वाढल्याने कार्ला फाटा चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
संध्याकाळपर्यंत हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. ढगाळ वातावरण, मधून पडणारा पाऊस, परिसरात पसरलेली हिरवाई यामुळे वातावरण अगदी अल्हाददायक बनले होते. लोहगड, विसापूर किल्ले परिसर, भाजे-कार्ला लेणी परिसर अशा सर्वत्र पर्यटकांची गर्दी होती.
दर्शनासाठी मोठी रांग
एकविरा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आल्याने गडावर देवीच्या दर्शनासाठी लांबलचक रांग लागली होती. सोबत गडापासून पायथा मंदिरापर्यंत भाविकांची रीघ होती. देवीच्या दर्शनासाठी भाविकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते.
पोलिसांची दमछाक
एकाच दिवशी मोठ्या संख्येने भाविक आल्याने वाहनांचीही संख्या वाढली. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने कार्ला फाटा येथे मोठी वाहतूक कोंडी झाली. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. सायंकाळपर्यंत पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.





