Pimpri : विसापूरच्या पायथ्याशी दुर्गसेवकानी साकारले बजरंगबलीचे मंदिर

पवनानगर : पवन मावळ व नाणे मावळच्या सीमेवर असलेल्या मालेवाडी गावाशेजारी तसेच विसापूर गडाच्या पायथ्याशी झाडाझुडपात बजरंगबलीची एक मूर्ती व आजूबाजूला प्राचीन मंदिराचे दगड अगदी विखुरलेल्या अवस्थेत त्याठिकाणी पडले होते. ऊन- पाऊस खात, झाडाझुडपात असलेल्या या मूर्तीसाठी एक छोटंसं सुंदर मंदिर बनउया असा निर्धार “सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान” मधील दुर्गसेवकांनी केला होता.
अखेर दुर्गसेवकांनी उराशी बाळगलेले स्वप्न साकार केले आहे. येत्या शुक्रवारी मंदिरातील मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी मशाल महोत्सव, शिवपूजा जलाभिषेक, रविवारी मुख्य कार्यक्रम सत्यनारायण महापूजा, पालखी मिरवणूक, मंदिर उदघाटन समारंभ, इतिहास संशोधक प्रमोद बोऱ्हाडे यांचे व्याख्यान, स्नेह भोजन अशी कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे.
सप्टेंबर २०२२ मध्ये मावळातील “सफर 361 गडांची सामाजिक प्रतिष्ठान” मधील सदस्य विसापूर गडावर चालले होते. सह्याद्री रांगेवर वसलेल्या मालेवाडी शेजारील विसापूरच्या वाटेवर त्यांना कसलाही निवारा नसलेली बजरंगबलीची मूर्ती व चौथर्याच्या काही दगडी झाडाझुडपात विखुरलेल्या अवस्थेत दिसल्या. या मूर्तीसाठी आपण एक सुंदर मंदिर बनवूया अशी त्यांना संकल्पना सुचली. त्याविषयी चर्चाही झाली आणि अखेर डिसेंबर 2022 मध्ये मंदिराच्या बांधकामाला सुरवात देखील झाली.
असे तयार झाले मंदिर
मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे दगड गावा-गावांमधून जुन्या पडक्या घरांचे, मंदिरांचे जमा करून आणण्यात आले. मावळ तालुक्यातील अनेक नेतेमंडळीनी, व्यावसायिकांनी, तरुणांनी या मंदिराच्या बांधकामासाठी पैसे व बांधकाम साहित्य पुरविले. दुर्गसेवकांनी उन्हा- पावसात, थंडी दिवसा-रात्री वेळ काढत हे काम पूर्ण केले. मंदिरापर्यंत रस्ता नसल्याने मालेवाडीतून भर पावसात, चिखल तुडवत मंदिरासाठी लागणाऱ्या सामानाची व मालाची डोक्यावर घेऊन पायपीट केली. मंदिराचे काम यंदा पूर्ण झाले असून येत्या रविवारी मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे व भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे.
यांनी केले प्रयत्न
या देखण्या मंदिराच्या उभारणीसाठी “सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान” चे खंडू धुमाळ, ओंकार केदारी, सागर परब, आकाश लालगुडे, कुणाल टाकळकर, प्रीतम उणवणे, राहुल बोरकर, विजय केदारी, सोमनाथ सातकर, दिलीप शिंदे, परशुराम बांगर, योगेश गायकवाड, अभिषेक सातकर, नवनाथ केदारी, शंकर जाधव, रवि केदारी, सोमनाथ म्हसे, सुधीर वाजे, सुधीर तळावडे, विठ्ठल गायकवाड, दिपक पितांबरे यांनी अहोरात्र कष्ट करून मंदिर साकारण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.





