Pimpri : ‘नवोदितांनी कुटुंबाचा विचार करून सिनेक्षेत्रात पाऊल टाकावं’

तळेगाव दाभाडे : ‘नाट्य आणि सिनेक्षेत्र चांगले आहे. परंतु नवोदितांनी आपल्या कुटुंबाचा विचार करून या क्षेत्रात पाऊल टाकावे. या क्षेत्रात जितकी प्रसिद्धी आणि पैसा मिळतो, तितकेच मोह आहेत. त्यामुळे आई-वडिलांचे संस्कार आणि भविष्याचा संपूर्ण विचार करून या क्षेत्रात यावं,’ असा सल्ला सुप्रसिद्ध सिने, नाट्य अभिनेते मोहन जोशी यांनी दिला.
तळेगाव दाभाडे येथील कलापिनीच्या ४८व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त मोहन जोशी उपस्थित होते. यावेळी जोशी यांच्या प्रकट मुलाखतीमधून त्यांचा कलाप्रवास जाणून घेण्याची संधी रसिकांना मिळाली. कार्यक्रमात मोहन जोशी यांच्या हस्ते वर्धापन दिनानिमित्त कलापिनी गौरव पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, पदाधिकारी, मोहन जोशी यांच्या पत्नी ज्योती जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
लीना परगी, ऋचा पोंक्षे आणि चैतन्य कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अभ्यंकर यांनी स्वागत केले. डॉ. परांजपे यांनी प्रास्ताविक केले. वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा सहस्त्रबुद्धे यांनी घेतला. हेमंत झेंडे यांनी आभार मानले. डॉ. विनया केसकर आणि विराज सवाई यांनी मोहन जोशी यांच्याशी प्रकट संवाद साधला. कार्यवाह विश्वास देशपांडे व सचिव संजय वाडेकर यांनी मोहन जोशी यांचा सत्कार केला.





