Pimpri : गावखेड्यांतील सौर दिव्यांखाली ‘अंधार’

नाणे मावळ : मावळ तालुक्यात ग्रामीण भागातील वाडी वस्त्यांवर, रस्त्यांवर रात्रीच्यावेळी प्रकाशाची सोय व्हावी व सोबत विजेचीही बचत व्हावी, यासाठी शासनाने सौर पथ दिवे योजनेच्या माध्यमातून गावोगावी सौर दिवे बसविले आहेत. मावळात जिथे गावखेड्यांची संख्या अधिक आहे, अशा ग्रामीण बहुल भागात लोकांना अंधारापासून मुक्ती मिळावी म्हणून खेडोपाडी सौर दिवे लावण्यात आले. परंतु अल्पावधीतच सौर ऊर्जेवर चालणारे हे सौर दिवे बंद पडल्याचे दिसत आहे. काही गावांत सौर दिव्यांचे खांब केवळ शोभेचे खांब ठरत असून रात्रीच्या वेळी सौर दिव्यांखाली अंधार असलेला दिसतो.
विजेची बचत व्हावी म्हणून शासनाकडून ग्रामपंचायतींना सौरऊर्जेच्या दिव्यांचा पुरवठा केला जातो. परंतु मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात फार कमी प्रमाणात सौर दिवे सुरू असून उर्वरित दिवे कायमचे बंदावस्थेत आहेत. सौर दिवे लावल्यानंतर त्यांच्या नियोजनाची जबाबदारी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवकांची होती. मात्र पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी ते ग्रामपंचायत स्थरावरील अधिकारी, कर्मचारी यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांत सौर दिवे बंद असल्याने या योजनेची तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे.
काही कालावधीनंतर सौर प्लेट तपासणी करणे आवश्यक असते, परंतु हे होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी बॅटरी चोरीला जाणे, नादुरुस्त झाल्यावर दुरुस्ती करण्यासाठी ग्रामपंचायतींकडून माहिती न घेणे, ग्रामपंचायत स्तरावर किती सौर ऊर्जेचे दिवे आहेत याकडे गटविकासअधिकारी किंवा संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. ही परिस्थिती मावळ तालुक्यातील जवळपास प्रत्येत खेडेगावात पाहायला मिळते.
चोरट्यांमुळेही सौर दिवे बंद
सौर दिव्यांमध्ये एलईडी किंवा सीएफएलचे बल्ब असणारे दिवे आहेत.सौर पॅनलद्वारे सौर ऊर्जा घेऊन ती साठविण्यासाठी खांबाच्या मधोमध बॉक्समध्ये बॅटरी आहे. जवळपास सर्वच ठिकाणी या बॅटरी बॉक्सला कुलूप नसल्याने चोरटे डल्ला मारून बॅटऱ्या चोरतात. काहीवेळा बल्ब देखील काढून लंपास केले जातात. काही गावातील खांबही गायब केल्याची विदारक परिस्थिती आहे. या वस्तूंना भंगारात चांगला भाव असल्याने चोरटे याची चोरी करतात. सौर पथ दिवे बंद असण्याचे हेही एक कारण आहे.
सौर पथ दिवे योजना
राज्यातील विजेची मागणी व पुरवठा यामधील तफावत पाहता अपारंपारिक उर्जेचा वापर करणे योग्य होणार असून राज्यातील ग्रामीण भागात सध्याचा विजेचा पुरवठा लक्षात घेता, ग्रामीण भागात पर्यावरण संतुलन प्रणित मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अपारंपारिक स्त्रोतातून निर्मित विजेचा पुरवठा व्हावा या उद्देशाने ग्रामीण भागातील रस्त्यांवर सौर पथ दिवे खांब उभारण्याची योजना सन २०१०-२०११ पासून कार्यान्वित केली आहे. ही योजना राज्य शासन, केंद्र शासन व ग्रामपंचायतींच्या सहभागातून राबवली जाते.





