Pimpri Crime : काम झालं, पैसे नाही! कन्स्ट्रक्शन कंपनीकडून ठेकेदाराची ८६ लाखांची फसवणूक

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या प्रतिनिधीने विद्युत कामाचे बिल कंपनीच्या खात्यावर जमा झाल्यानंतर कंत्राटदाराला उर्वरित ८६ लाखांहून अधिक रक्कम न देता त्याची आर्थिक फसवणूक केली. ही घटना १३ नोव्हेंबर २०२१ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी, पिंपळे गुरव येथे घडली.
या प्रकरणात संदेश निवृती थिटे (वय ५०, रा. औंध, पुणे) यांनी मंगळवारी (दि. १४) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रचित बाळासाहेब इंगवले (रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे आरोपीने फिर्यादीला भोसरी बापुजी बुवा चौक ते पी.एम.टी. चौकापर्यंतच्या रस्त्याच्या विद्युतविषयक कामाची वर्क ऑर्डर दिली होती.
फिर्यादीने हे काम वेळेत पूर्ण केले आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही पूर्णत्वाचा दाखला दिला. त्यानंतर फिर्यादीने केलेल्या कामाच्या खर्चाची बिले महानगरपालिकेत जमा केली. या बिलांची एकूण रक्कम १ कोटी ९९ लाख ९३ हजार १४५ रुपये ही इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बँक खात्यावर जमा झाली. परंतु, कंपनीने फिर्यादीला केवळ ६३ लाख १२ हजार ४२३ रुपये देऊन त्यांची उर्वरित ८६ लाख ४४ हजार २१९ रुपये रक्कम दिली नाही.
फिर्यादीने आरोपीकडे उर्वरित रक्कमेबाबत विचारणा केली असता, आरोपीने ‘तू जी.एस.टी वेळेवर भरला नाहीस, मी तुझी रक्कम तुला देणार नाही, तुला काय करायचे ते कर व माझी कोठेही तक्रार कर मी कोणालाही घाबरत नाही’ अशी धमकी देऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.




