प्रभात वृत्तसेवा पिंपरी – सांगवी आणि वाकड पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात बेकायदेशीर वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन स्पा सेंटरवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी धडक कारवाई केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा यांनी टाकलेल्या छाप्यानंतर ‘न्यू ओम स्पा’ (पिंपळे सौदागर) आणि ‘रुपेन स्पा’ (वाकड) ही दोन स्पा सेंटर एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले आहेत. सांगवी पोलीस ठाणे हद्दीतील व्हिजन गॅलरी मॉल, पिंपळे सौदागर येथे असलेल्या ‘न्यू ओम स्पा’मध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत आकाश सुरेश साळवे आणि संदीप संतोष तिवारी यांच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी यांनी या स्पावर बंदीची शिफारस केली होती. वाकड पोलीस ठाणे हद्दीतील सॉलिटेअर बिझनेस हब, काळेवाडी फाटा येथे असलेल्या ‘रुपेन स्पा’ सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून शैला कलप्पा कांबळे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे स्पा सेंटरही सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात असल्याने त्यावर बंदीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. दोन्ही प्रस्तावांवर सखोल चौकशी केल्यानंतर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी हे स्पा सेंटर वेश्याव्यवसायासाठी वापरले जात असल्याचे निष्पन्न केले. त्यामुळे ‘न्यू ओम स्पा’ आणि ‘रुपेन स्पा’ हे दोन्ही स्पा सेंटर ७ नोव्हेंबर २०२५ पासून एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश जारी केले.