Pimpri Crime : पिंपळे सौदागरात ऑनलाइन ठगी ; गुंतवणुकीच्या नावाखाली ४८ लाखांची फसवणूक

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – ट्रस्टलाइन सिक्युरिटीज् या नावाखाली ऑनलाइन गुंतवणुकीचे आमिष दाखवून ४८ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना ३० जुलै ते १० सप्टेंबर या कालावधीत पिंपळे सौदागर परिसरात घडली आहे.लक्ष्मी प्रिया पांडा (ट्रस्टलाइन सिक्युरिटीज् कंपनीची कर्मचारी), ट्रस्टलाइन सिक्युरिटीज् सर्कल ग्रुप अॅडमिन व इतर लाभार्थी खातेधारक (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत लोटस हॉस्पिटलजवळ, पिंपळे सौदागर येथील ५२ वर्षीय व्यक्तीने शुक्रवारी (दि. ३) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने व्हॉट्सअॅप नंबरवर संपर्क करून ट्रस्टलाइन सिक्युरिटीज् सर्कल या ग्रुपमध्ये सामील केले.
स्टॉक मार्केट गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल, असे सांगून फिर्यादीकडून ४८ लाख ३६ हजार रुपये विविध खात्यांमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली घेतले. नफा दाखवून पैसे विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला असता रक्कम मिळाली नाही आणि आरोपींनी संपर्क तोडला. या प्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.





