प्रभात वृत्तसेवा पिंपरी – गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत एकाची ७१ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी (दि.४) सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी पीडित व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित मोबाइलनंबर धारक तसेच आठ बँक खातेधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना १० ऑगस्ट ते ८ ऑक्टोबर दरम्यान घडली. सुरुवातीला आरोपींनी फिर्यादी व्यक्तीला त्यांच्या मोबाइल फोनवर लिंक पाठवून वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून संपर्क केला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या परताव्याचे आमिष दाखविले. काही गुंतवणूक करून घेत त्याचा खोटा इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार केला व त्या माध्यमातून मोठा नफा झाला असल्याने फिर्यादी यांना दाखविण्यात आले. या आमिषाला बळी पडून फिर्यादी यांनी एकूण ७१ लाख ७० हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपींनी सर्व रक्कम लुबाडली. सायबर पोलीस तपास करीत आहेत.