प्रभात वृत्तसेवा पिंपरी – एका अनोळखी व्यक्तीने रावेत येथील एक व्यक्ती आणि त्यांच्या मुलांच्या ईमेल आयडीवर वेळोवेळी मेल पाठवून आणि बॉम्ब सदृश्य संशयास्पद वस्तू कुरिअरने पाठवून डॉलरमध्ये खंडणीची मागणी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ही घटना २१ नोव्हेंबर १४ डिसेंबर या कालावधीत रावेत येथे घडली. या प्रकरणी रमेश गणपतआप्पा रूमाले (वय ५४, रा. रावेत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला एका अनोळखी व्यक्तीने रुमाले यांना मेल करून १० हजार डॉलरची मागणी केली. पैसे न दिल्यास चोवीस तासानंतर ३० हजार डॉलर द्यावे लागतील अशी धमकी दिली. त्यानंतर दुसऱ्या मेलमध्ये ३० हजार डॉलरची मागणी केली. ८ डिसेंबर रोजी रुमाले यांच्या घरी उबर ॲटो मार्फत पत्र आणि पार्सल पाठवण्यात आले, ज्यात बॉम्ब सदृश्य संशयास्पद वस्तू होती आणि पत्रात २० हजार डॉलरची मागणी होती. फिर्यादीने सुरुवातीला हा खोडसाळपणा केला असावा, असे समजले. परंतु १४ डिसेंबर रोजी पहाटे पुन्हा धमकीचा मेल आला, ज्यात १२ हजार डॉलरची मागणी केली आणि पूर्ण न केल्यास चोवीस तासानंतर २० हजार डॉलर द्यावे लागतील, अशी धमकी दिली. रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.